coronavirus : चिंतेची काजळी धरलेलं मन, कोरोना काळात कसं स्वच्छ कराल ? इमोशनल हायजिनचं  काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 07:00 AM2020-04-16T07:00:00+5:302020-04-16T07:00:06+5:30

‘घाबरू नका; पण सावध राहा, काळजी घ्या’, असं आवाहन केलं जातंय; पण म्हणजे नेमकं काय करायचं? ‘हात स्वच्छ ठेवा’, हे ठीक आहे, पण त्या हातांच्या मागे एक मन आहे. त्यात भावना आहेत आणि विचारही आहेत. त्यांचं काय करायचं? ते कसे स्वच्छ ठेवायचे?

coronavirus : practice mental & emotional hygiene in corona crisis. | coronavirus : चिंतेची काजळी धरलेलं मन, कोरोना काळात कसं स्वच्छ कराल ? इमोशनल हायजिनचं  काय ?

coronavirus : चिंतेची काजळी धरलेलं मन, कोरोना काळात कसं स्वच्छ कराल ? इमोशनल हायजिनचं  काय ?

Next
ठळक मुद्दे‘काळजी घेणं’ आणि ‘काळजी करणं’ या दोन भावनांमधला फरक नेमका कसा ओळखायचा?

-  डॉ. आनंद नाडकर्णी

अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटाला अख्खं जगच आपापल्या परीनं तोंड देतंय. त्याबाबत काळजी घेतंय. त्या त्या सरकारांनी आपापले देश लॉकडाउन करण्याच्या आधीच अनेकांनी स्वत:ला आपापल्या घरात कोंडून घेतलं. स्वत:च्या बाहेर पडण्यावर, प्रवासावर र्निबध आणतानाच स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या उपायांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. 
शारीरिक पातळीवर या सर्व गोष्टी करणं आवश्यकच होतं. त्या त्या प्रत्येकानं केल्या आणि अजूनही करताहेत. एका गोष्टीकडे मात्र आपलं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय, ते म्हणजे शारीरिक आरोग्याची जेवढी काळजी आपण घेतोय, त्या प्रमाणात मानसिक आरोग्याची, इमोशनल हायजिनची काळजी कुठेच घेतली जाताना दिसत नाहीये. 
कोरोनाच्या साथीला आपण सारेच तोंड देतोय, त्याला आपलं फक्त शरीरच नव्हे तर मनही प्रतिसाद देतंय; पण या मनाच्या आरोग्याकडे आपलं लक्ष आहे कुठे? खरं तर आताच्या बिकट परिस्थितीत, लोकांनी आपल्याला कोंडून घेतलेलं असताना, सगळीकडे भीतीचं सावट असताना आणि आपली कार्यक्षमता आपल्याला जवळपास सुप्तावस्थेत ठेवावी लागत असताना, अनेकांना नैराश्य येण्याची शक्यता असताना मनाचं आरोग्य सुदृढ ठेवणं अधिक गरजेचं आणि महत्त्वाचं आहे.
या काळात आपल्या मनाचा प्रतिसाद सकारात्मक कसा असेल, त्याचं नियमन आणि नियोजन कसं करायचं, हा कळीचा प्रश्न आहे.
कोरोनाला आपल्यापासून रोखण्यासाठी सॅनिटायजर, साबणानं सातत्यानं हात धुवा, कुठेही हात लावू नका, असं आपल्याला सांगितलं जातंय. ते बरोबरही आहे; पण आपल्या याच हातांच्या मागे एक मन आहे. त्यात भावना आहेत आणि विचारही आहेत. या भावनांचं सकारात्मक पद्धतीनं नियोजन आणि भावनिक व्यवस्थापनही तितकंच गरजेचं आहे. तसं केलं तरच आपल्या कोणत्याही कृती आपण अधिक जबाबदारीनं करू शकू. 
‘घाबरू नका; पण सावध राहा, काळजी घ्या’, असं आवाहनही आपल्याला केलं जातंय; पण म्हणजे नेमकं काय करायचं, या दोन भावनांमधला फरक कसा ओळखायचा, हे आपल्याला कोणीच सांगत नाही. 


‘सावध राहणं’ आणि ‘काळजी करणं’, या दोन भावनांत मुळातच फरक आहे. जेव्हा आपण सावध असतो, तेव्हा अनेक गोष्टींची आपण काळजी घेतो आणि आलेल्या, येऊ घातलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असतो; पण आपल्या मनात भीतीची भावना असेल तर आपण काळजी करायला लागतो. 
‘करायला माङयाकडे काहीच नाही. मग आता वेळ घालवायचा’ तरी कसा, असा प्रश्नही अनेकांपुढे उभा राहतो आहे. विशेषत: तरुणांना तर या प्रश्नानं फारच छळल्याचं दिसतं आहे. त्यावर अनेकांनी फारच सोप्पा उपाय शोधलाय. स्क्रिन ! मुख्यत: मोबाइलचा. त्यानंतर कॉम्प्युटर नाहीतर टीव्हीचा ! एकाचा कंटाळा आला की दुस:यासमोर बसायचं. त्याचाही कंटाळा आला, की मग फोन. तासन्तास गप्पा ! एक दिवस तर गेला. दुस:या दिवशी काय? - तर पुन्हा तेच! 
या गोष्टी अजिबात बंद कराव्यात असं नाही; पण स्क्रिनचा ऑप्शन मर्यादित ठेवला तर आजच्या ‘घरबंदी’च्या काळातही अनेक चांगले पर्याय आपले आपल्यालाच सापडू शकतात. स्क्रिनपासून थोडं लांब व्हा. बघा, या अस्वस्थतेतूनच काही नवे, चांगले पर्याय सापडतील. काही शोधताही येतील. कुठल्याही बंधनांवर ते मात करतील!
हतबल होत, मनाशी कुढत राहून काहीच साध्य होत नाही. कुठल्याही परिस्थितीत आपल्या ‘हातात’, आपल्या नियंत्रणात काही ना काही गोष्टी असतातच.

 
समजा, आता कोरोनाची साथ सुरू आहे. अशावेळी माङया नियंत्रणात काय आहे आणि कोणत्या गोष्टी माङया नियंत्रणात नाहीत, याचा विचार करणं गरजेचं आहे. जी परिस्थिती आपल्या नियंत्रणात असेल, त्यावर आपण सतत काम करीत राहायला हवं. बंधनं असतीलच; पण बंधनांतही माझी क्रिएटिव्हिटी, उत्पादकता कशी वाढवता येईल, असा विचार जर आपण करीत असू तर तो झाला सावधपणा. पण, ‘बापरे, आता काय होईल, मी काय करू?’ असे प्रश्नचिन्हांकित विचार जेव्हा आपल्या मनात गर्दी करू लागतात, तेव्हा ती भीतीची भावना असते. जेव्हा अनिश्चितता वाढते, तेव्हा भीतीची भावना मनात गर्दी करू लागते. अशी अनिश्चितता स्वीकारायला आपलं मन तयार नसतं.
अनिश्चितता, हा तर निसर्गाचा स्वभावच आहे. निश्चितता, कधीच, कुठेच नव्हती. पुढेही कायमस्वरूपी ती कधीच असणार नाही. मग त्या अनिश्चिततेला घाबरायचं कशाला? तिला तोंड द्यायला हवं. आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर अशा अनिश्चिततांना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. 
अनिश्चितता आली की, आपल्या मनात धोक्याची घंटा वाजायला लागते; पण हा ‘धोका’च आपल्यासाठी ‘मोका’ही असतो. कारण त्यानिमित्तानं आपण सावध होतो आणि पुढच्या संकटांवर मात करण्याची आपली क्षमता आपण वाढवत जातो. 
कोरोनामुळे आज काहीशी कुंठित अवस्था झाली असली तरीही सर्व काही थांबलेलं नाही, हा केवळ विराम आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. या विरामाचा उपयोग आपल्याला पुढची ङोप घेण्यासाठी करायचा आहे. आपला आजचा विराम, उद्याच्या उत्पादकतेसाठी आहे. व्यक्ती म्हणूनही आणि नागरिक म्हणूनही.
माणसं कोलमडून न पडता, पुन्हा हिमतीनं उभी राहायची असतील, तर काय करावं लागेल? - त्याबद्दल बघूया पुढच्या अंकात !



(लेखक इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ- ‘आयपीएच’ या संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
शब्दांकन : समीर मराठे 

Web Title: coronavirus : practice mental & emotional hygiene in corona crisis.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.