मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?

By Admin | Updated: April 12, 2017 16:06 IST2017-04-12T16:06:13+5:302017-04-12T16:06:13+5:30

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब..

Can live with values-principles? | मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?

मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?

निर्माण आणि आॅक्सिजन


उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा चौथा प्रश्न : मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?


प्रायॉरिटी काय? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला की उत्तरं सापडतातच!
मूल्यव्यवस्था काय असते? माझ्या जीवनात मूल्यं असावीत का? असावीत तर का? - हे प्रश्न माझ्या मनात कधीच निर्माण झाले नव्हते. जेव्हा निर्माणचं शिबिर केलं त्यावेळी मूल्य, तत्त्व आणि जीवनध्येय या शब्दांची ओळख झाली. 
मग कळलं की जीवनात मूल्यांचं मूल्य आहेच. ज्याप्रमाणे गणितामध्ये समीकरण सोडवताना एक्सची किंमत काढावी लागते तसंच जीवनाचे प्रश्न/समीकरण सोडविण्यासाठी मूल्यं ठरवणं आवश्यक असतात. तरच जीवनाचं समीकरण योग्य सुटू शकेल.
मी एक डॉक्टर आहे. नागपूरहून बीएएमएसची पदवी घेतली. मेडिकलची डिग्री घेतल्यावर आता पुढे काय करू हा गोंधळ प्रत्येकाच्या मनात असतो. माझ्याही होता. परंतु निर्माणचं शिबिर केल्यावर गोंधळ जरा कमी व्हायला लागला. माझ्या जीवनात मी ज्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो त्या गोष्टी म्हणजे माझी मूल्यं असतात. ती मी हळूहळू डिफाइन करत गेलो. कामाचं समाधान न देणारी सरकारी नोकरी सोडून वैद्यकीय सेवा देण्याचा आनंद आणि समाधान देणारी गडचिरोलीतल्या फिरत्या दवाखान्यातली नोकरी करण्याचा निर्णय याच मूल्यांमुळे घेता आला. मी जे काम करतो आहे त्यानं मला आनंद मिळायला हवा आणि समाधान पण हे मूल्य. सध्या मी जळगाव व अंतुर्ली येथे दवाखाना चालवतो आहे. दवाखाना चालवत असताना अनेक प्रलोभने माझ्यासमोर आली. पण माझं मूल्य आहे की कट प्रॅक्टिस करणार नाही. त्यामुळे मला त्यापासून दूर राहता येतं. आणि मी ते करत नाही याचा आनंद मिळतो. कट प्रॅक्टिस हा मेडिकल फिल्डमधला एक गहन चर्चेचा विषय आहे. चिकित्सा करताना परिणामकारकता, गुणवत्ता आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस ही मूल्यंपण जोपासतो आहे. त्यामुळे रुग्णाची ट्रीटमेण्ट करताना हलगर्जीपणा येत नाही आणि रुग्ण कमी पैशात लवकर बरा होतो. आनंदी राहतो.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य बदलत जाऊ शकतात. शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना, लग्नानंतर मूल्य बदलत जातात. आज पैसा कमविणे कदाचित माझी प्रायोरिटी असेल, उद्या पुरेसा मिळाल्यावर नसेलही. जीवनातील माझ्या प्रायोरिटीज बदलल्या की मूल्यं बदलतात. तत्त्वं मात्र आजीवन तीच राहतात. 
मूल्य म्हणजे अशा गोष्टी ज्या जगताना माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. कुणाला फिजिकल फिटनेस, आरोग्य, एकता, समानता, शिस्त, प्रामाणिकपणा, परिवार, प्रतिष्ठा, कठोर मेहनत, एकता, खरं बोलणं असतात, जी प्रत्येकाची निराळी असू शकतात.
मूल्यं प्रत्येकाच्याच जीवनात असतात, परंतु आपल्या मूल्यांशी आपला परिचय नसतो. ज्यावेळी आपला मूल्यांशी परिचय होतो तेव्हा जगताना निर्णय घेणं अधिक सोपं होऊन जातं. मी कुठला जॉब निवडू? मी नोकरी करू की व्यवसाय करू? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपली मूल्यव्यवस्था मजबूत असेल तर आपण सोडवू शकतो. आपल्या मूल्यांच्या यादीत सगळ्यात वर कुठल्या आहेत आणि खाली कोणती आहेत याची क्रमवारी लावणं महत्त्वाचं आहे. एखाद्या परिस्थितीत निर्णय घेताना माझ्या जीवनात कुठली मूल्यं सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानं निर्णय घेताना गोंधळ होणार नाही. 
वैयक्तिक मला जगताना या मूल्यव्यवस्थेचा फायदा जीवनाच्या प्रत्येक वळणावरून जाताना होतो आहे. - भूषण देव, निर्माण ५
 

V = IR हे सूत्र आयुष्यातही लागू होतंच की!
मी एक मेडिको. स्पाइन (पाठीचे हाड) आणि मूल्य या दोघांमध्ये कमालीचं साम्य वाटतं मला. एक जरी नसला तरी माणसाचं ताठ मानेनं जगणं अवघड. एमबीबीएस करताना प्रत्येक भावी डॉक्टरच्या मनात खूप सारी स्वप्नं असतात. स्वत:चं असं मोठं हॉस्पिटल असावं. 
फिजिक्समध्ये V = IR हा फॉर्म्युला मला फार मजेशीर वाटायचा. त्यात V म्हणजे पोटेन्शिअल (क्षमता) अन् R म्हणजे रेजिस्टन्स (विरोध=अडचणी)
I म्हणजे करंट (मी) जर कॉन्सण्ट असेल तर हेच समीकरण जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर मांडतो. जेवढं जास्त रेजिस्टन्स तेवढे जास्त पोटेन्शियल! 
माझ्या छोट्याशा बुद्धीला मूल्यांचा जो अर्थ कळला त्यावरून माझ्या क्षेत्रात होणाऱ्या व मला न पटणाऱ्या गोष्टींची एक लिस्ट मनात तयार झाली. जेनेरिक मेडिसीन उपलब्ध असतानाही रुग्णालयात जेव्हा गरीब रुग्णाला महाग गोळ्या घ्याव्या लागतात, कट प्रॅक्टिसच्या जाळ्यात अडकून जेव्हा पेशंटला काहीही काम नसलेल्या टेस्टिंग करायला लावल्या जातात तेव्हा डॉक्टरांना पण मूल्यांचा विसर पडतोय असं दिसलं.
या जाणिवेनंतर माझ्या मूल्यांची बांधणी होण्यासाठी वेळ लागला नाही. काय करायचं नाही याचा विचार वाढला. आणि तो कृतीतदेखील उतरला. सध्या मी जेनेबॉक्स नावाचा एक औषधांचा डबा बनवला आहे. त्याला १० भागात विभागून प्रत्येक भागात एक एक वेगळी औषधी (जेनेरिक) भरली आहे. असे दोन डबे मी तयार करून माझ्या गावाच्या घरी दिले. आता घरून फोन आला की मी त्यांना औषधाचा विभाग क्र मांक सांगतो. त्यामुळे आता त्यांना जेनेरिक गोळ्या सहज उपलब्ध होताहेत.
या सर्वात मला खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.
तुमचं प्रोफेशन सोडलं तर बाकीच्या तुमच्या जीवनात तुम्ही काय करता त्यावरून तुमच्या व्यक्तिगत जीवनात फार फरक पडतो.
म्हणून मूल्यं आणि तत्त्वं ही हवीच. आणि ती कागदावर नाहीत तर मनात कोरली जायला हवीत. रोजच्या जीवनाचा ती भाग व्हावीत, ते महत्त्वाचं आहे.- शुभम घोरमोडे, निर्माण ७






आपला निर्णय आपण घ्यायचा!
मी माझ्या आयुष्यातील गेल्या दोन-तीन वर्षांकडे बघतो तर मला जाणवतं की या काळात बरेच गुंतागुंतीचे आणि गोंधळात टाकणारे प्रसंग/घटना घडल्या. अशा प्रसंगी गोंधळून जाऊन निर्णय चुकण्याची शक्यता जास्तच असते. परंतु माझ्या बाबतीत तसं झालं नाही. 
उदाहरणच सांगायचं झालं तर, महाविद्यालयीन निवडणूक लढवीत असताना माझ्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडून विद्यार्थी मतदारांना बऱ्याच प्रकारचं आमिष, पार्ट्या, वेळप्रसंगी दारूपण देणं सुरू होतं. अशा परिस्थितीत माझा सहयोगी मित्रांनी जमेल त्याला पार्टी आणि मागेल त्याला दारू देण्याचा सल्ला दिला. असं न केलास आपण कशा प्रकारे निवडणूक हरू याची भीती पण दाखवली. मी ‘कधीच दारू पिणार नाही आणि पाजणार नाही’ हे माझं मूल्य असल्यानं वारंवार सहयोग्याकडून दारू पाजण्याचा दबाव येऊन पण मी माझ्या मताशी ठाम राहिलो. पार्टी/दारू न दिल्यास आपण निवडणूक हरूपण शकतो याची जराशीही भीती वाटली नाही. उलट मी आत्ता त्या प्रसंगाकडे बघतो तर मला समाधानच वाटतं की त्या कसोटीच्या प्रसंगी पण स्थिर राहून योग्य तो निर्णय मी घेऊ शकलो.. 
आपण आपला मूल्याधारित निर्णय घेतल्यावर ‘लोक काय म्हणतील’ किंवा ‘आपला निर्णय चुकला तर’ अशी असुरक्षितता उरत नाही. मला असं वाटतं की, आयुष्यात एखादी गोष्ट चूक की बरोबर अथवा चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी मूल्यव्यवस्थेचा मोजपट्टीसारखा उपयोग होतो. फक्त फायदा-तोट्याचाच विचार न करता त्यापलीकडे जाऊन अधिक व्यापक निकषाधारित विचार करून निर्णय घेण्याची मग सवय लागते.
- सतीश गिरसावळे, 
निर्माण ७
 
 
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण फार कठीण नाहीये. ‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातला पूल असेल आकाश भोर. आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे. तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.
त्यासाठी ईमेल :nirman.oxygen@gmail.com यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल. आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल
www.lokmat.com/oxygen इथे!!!



 

 

Web Title: Can live with values-principles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.