-संतोष मिठारी
दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचं अंतिम वर्ष हे म्हणजे करिअरचे महत्त्वाचे टप्पे. एरव्ही शिक्षण फार सिरिअसली न घेणारेही या महत्त्वाच्या वर्षांत, निदान शेवटी शेवटी का होईना, गंभीर होतात. रट्टे मारतात, नाइट मारतात; पण अभ्यासाला लागतात.एवढं वर्ष तरी दणकून मार्क आणू, मग पुढचं पुढे म्हणतात. यंदा मात्र काही मुला-मुलींची हे वर्ष परीक्षाच पाहतं आहे. कोरोना काळानं शिक्षणाचं स्वरूप, ऑनलाइन शिकणं-शिकवणं, त्यातल्या अडचणी, रेंज नसण्यपासून ते घरात धड खायला नसेपर्यंत होणारे काहींचे हाल. अशा परिस्थितीत अभ्यासात ‘फोकस’च करणं अवघड आहे, नुसती दिली परीक्षा आणि मार्कच बरे आले नाहीत तर गेलं वर्ष पाण्यात, पुन्हा कुठं जाणार नोकरी मागायला, असाही अनेकांचा सवाल आहे.हा पेच सोडवायचा म्हणून यंदा काही विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की, ‘ड्रॉप’ घ्यायचा. इअर ड्रॉप.तसंही अनेकजण अभ्यास झाला नाही म्हणून पूर्वी ड्रॉप घेत, रिपीट करत परीक्षा. पण यंदा मात्र आपलं ऑनलाइन शिकणं, अभ्यास आणि आर्थिक परिस्थिती यांच्यापायी अनेकजण ड्रॉप घ्यायच्या निर्णयाप्रत पोहोचले आहेत.शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतील विविध अधिविभागांनी जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू केले; पण नेटवर्कसह अन्य तांत्रिक अडचणी, वर्गातील शिक्षणाच्या तुलनेत एखादा मुद्दा समजून घेण्यातील र्मयादा, आवश्यक त्या प्रमाणात योग्य मार्गदर्शन आणि वेळ मिळत नसल्याच्या अडचणी विद्यार्थीच नाही तर शिक्षकांच्याही वाट्याला आल्या. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन शिक्षणात र्मयादा तर खेडोपाडी खूपच आहेत.त्यात अंतिम वर्ष वगळता दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार, या परीक्षांचे फॉर्म कधी भरून घेतले जाणार, याबाबत अद्याप शासनाकडून काहीच स्पष्टता मिळालेली नाही. अशा स्थितीत शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या या वर्षांमध्ये कमी गुण मिळाले तर पुढे काय? अशी भीती बरीच मुलं बोलून दाखवतात. त्यामुळे पालकांच्या संमतीने यावर्षी ड्रॉप घेण्याचं ठरवावं, नंतर पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी असं मनात असल्याचं मुलांनी सांगितलं.
-----------------------------------------------------
जे विद्यार्थी आता दहावी, बारावीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील काही विद्यार्थी या शैक्षणिक वर्षापुरते शिक्षण स्थगित ठेवण्याचा विचार करीत आहेत. ऑनलाइन कनेक्टिव्हिटी हा अनेकांसाठी मोठा प्रश्न आहे.कमी मार्क मिळून, चांगली संधी गेली तर काय, या भीतीने काहीजण हा निर्णय घेत आहे. तो दुर्दैवी असला तरी त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार करून घेतलेला असावा.
- डॉ. व्ही. एन. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
सध्या सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्याअंतर्गत रोज सुरू असलेल्या लेक्चरला विद्यार्थी कंटाळले आहेत. एकीकडे ऑनलाइन लेक्चर इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी लागणार्या आयुधांचा शिक्षकांकडे असणारा अभाव आणि दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण, भोवतालच्या वातावरणामुळे आलेली निराशा या सर्वांचा परिणाम म्हणूनही अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक गांभीर्य दिसत नाही.विद्यार्थ्यांच्या अटेन्शन स्पॅनचा प्रश्न निर्माण होतो आहे. - डॉ. उत्तम जाधवअधिष्ठाता, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
--------------------------------------------------------------------------------------------
‘इअर ड्रॉप’ कशामुळे?
* ऑनलाइन शिक्षण घेण्यातील तांत्रिक अडचणी.
* शिक्षण घेण्यासाठी पुरेशी डिजिटल साधनं नाहीत.
* विषय समजून घेण्यात येणार्या र्मयादा.
* कमी गुण मिळतील याबाबतची भीती.
* मार्क कमी मिळाले तर पुढे चांगलं कॉलेज, नोकरी न मिळण्याची भीती.
( लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)
santaji.mithari@gmail.comयंदा