महागडय़ा लग्नाची अपयशी गोष्ट?
By Admin | Updated: October 30, 2014 20:03 IST2014-10-30T20:03:59+5:302014-10-30T20:03:59+5:30
तुम्ही कमी खर्चाला कात्रीच लावणार असाल आणि स्वत:चं लग्न धूमधडाक्यात प्रचंड पैसा (तोही आईवडिलांचा) खर्चूनच तुम्ही बोहल्यावर चढायचं ठरवतच असाल तर आधी हा अभ्यास वाचा !

महागडय़ा लग्नाची अपयशी गोष्ट?
चिन्मय लेले
काहीही !!
- असं कधी असतं का?
म्हणे लग्नात जास्त खर्च करू नका. साधेपणानं लग्न करा.
पण हौसमौज असं काही असतं की नाही ?
लग्न काय आपण रोज रोज करतो का ?
लग्नात नाही करायचा खर्च तर कधी करायचा ?
अगदीच ‘उरकून’ टाकायचं लग्न तर लोक काय म्हणतील ?
असे ढीगभर प्रश्न तुमच्या मनात येऊन गेलेही असतील!
आणि साधेपणानं लग्न करा, गावजेवण घालू नका, कमीत कमी माणसांना लग्नाला बोलवा, भरमसाठ पदार्थ ठेवून ‘बुफे’ जेवणात अन्नाची नासाडी करू नका, असं सांगणा:या कुणा वडीलधा-याला तुम्ही बोअर समजत असालही कदाचित.
आणि एखाद्या मित्रनं सांगितलंच असं काही कट्टय़ावर की, बाकीचे सगळे म्हणणार, हे आले आम्हाला शहाणपणा शिकवायला? स्वत:ची नाही ऐपत पैसे खर्चायची म्हणून हा साधेपणाचा आव !
तर असं बरंच काही तुमच्या मनात येऊन तुम्ही कमी खर्चाला कात्रीच लावणार असाल आणि स्वत:चं लग्न धूमधडाक्यात प्रचंड पैसा (तोही आईवडिलांचा) खर्चूनच तुम्ही बोहल्यावर चढायचं ठरवतच असाल तर आधी हा अभ्यास वाचा !
आणि मग ठरवा की, खरंच वारेमाप पैसा खर्च करणं हे आपल्या नात्यातल्या प्रेमाचं प्रदर्शन असतं, की आपल्या प्रतिष्ठेचं !
आणि ते ‘प्रदर्शन’ करून आपलं लग्न टिकेल, वैवाहिक सुख उत्तम लाभेल याची काय गॅरण्टी?
ती गॅरण्टी नाहीच देता येत, उलट जे लग्नात जास्त खर्च करतात त्यांची लग्न कमी टिकतात, जास्त भांडणं होऊन घटस्फोटावर येतात जोडपी; असं म्हणणं आहे अमेरिकेतल्या ‘इमोरी विद्यापीठा’तल्या अर्थतज्ज्ञांचं.
अॅण्ड्र एम फ्रान्सिस आणि हुगो एम मायलॉन या अर्थतज्ज्ञांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याचं नाव आहे, ‘अ डायमण्ड इज फॉरेएव्हर अॅण्ड ऑदर फेअरी टेल्स : द रिलेशनशिप बिटविन वेडिंग एक्स्पेन्सेस अॅण्ड मॅरेज डय़ुरेशन’.
अमेरिकेतल्या तीन हजार जोडप्यांना ते भेटले. त्या जोडप्यांना वैवाहिक जीवनाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. लग्नाचं आत्ताचं स्टेटस, लग्न होऊन किती वर्षे झाली, मुलं किती आहेत, लग्नापूर्वी ती दोघं एकमेकांना ओळखत होती का, किती वर्षे, लग्न ठरलं त्यावेळेसच्या भावना काय होत्या, कसं ठरलं लग्न, कुणी ठरवलं, साखरपुडा कसा झाला, हनिमूनला कुठे गेले, त्यासाठी किती पैसे खर्च झाले, अंगठी किती ग्रॅम सोन्याची, हि-याची होती, त्यासाठी किती पैसे खर्च झाले, लग्न कसं झालं, किती माणसं लग्नाला आली होती, लग्नाच्या वेळी वय काय होतं, दोघं कमावते होते का, साधारण दोघांच्या पगारात काय तफावत होती, पूर्वी कुठे रहायचे, आता कुठे राहतात, लग्नाचा खर्च कसा केला, किती केला, कुणी केला, असे बरेच बारीक बारीक प्रश्न या जोडप्यांना विचारण्यात आले.
मग तो सगळा डाटा गोळा करून या अर्थतज्ज्ञांनी त्याचा अभ्यास केला.
आणि त्यांच्या हाती लागलेला तपशील चक्रावून टाकणारा होता.
ज्या जोडप्यांनी लग्नात कमी खर्च केला ते तुलनेनं सुखी होते, त्यांचं वैवाहिक जीवन अधिक सुखकर होतं, लग्नही जास्त काळ टिकलं होतं.
त्याउलट ज्यांनी लग्नात खूप खर्च केला, महागडी गिफ्ट दिली, घेतली, एंगेजमेण्ट रिंगवरच काही शे डॉलर्स खर्च केले त्यांचं लग्न कमी टिकलं. संसाराची गाडी बरेचदा खडखडली, पंरही झाली.
हा अभ्यास तर म्हणतो की, ज्या जोडप्यांनी हजारभर किंवा त्याहूनही कमी डॉलर लग्नासाठी खर्च केले त्यांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण अगदीच कमी दिसले.
याउलट ज्यांनी दोन हजारांहून अधिक डॉलर्स म्हणजेच 12 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला त्यांचं घटस्फोटाचं प्रमाण जास्त.
यातलं लॉजिक इतकंच की, कमी खर्च कमी घटस्फोट, जास्त खर्च जास्त घटस्फोट.
अर्थात खर्चाप्रमाणोच वयातलं अंतर, शिक्षणातली तफावत, कुणा एकाचाच जास्त पगार हे सगळंही अनेकांच्या संदर्भात घटस्फोटाचं कारण ठरताना दिसतं !
आता हे सारं वाचून तुम्ही म्हणाल की, हा अभ्यास आपल्याकडचा कुठेय? हे सारं तर अमेरिकेतलं.
हे जरी खरं असलं तरी जग जवळ येत चाललंय. तिकडचं जगणं जर बाकी संदर्भात आपण स्वीकारणार असू, तर त्यांच्या जगण्यातले काच आज ना उद्या आपल्यालाही काचणारच!
तेव्हा लग्न करताना आणि आईबाबांचे पैसे वाट्टेल तसे उडवताना विचारा स्वत:ला, खरंच हा एवढा दिखावा करण्याची गरज आहे का?
साधेपणानं केलं लग्न तर काय आपलं प्रेम कमी होणार आहे का?