मनासारख्या साडीची सुंदर घडी
By Admin | Updated: September 17, 2015 22:59 IST2015-09-17T22:59:41+5:302015-09-17T22:59:41+5:30
कपाटात साठविलेल्या प्रत्येक साडीची एक आठवण, अटॅचमेंट असते. नव:याने दिलेली पहिली साडी, दिवाळीची साडी, सहज आवडली म्हणून घेतलेली साडी

मनासारख्या साडीची सुंदर घडी
- अदिती मोघे
कपाटात साठविलेल्या प्रत्येक साडीची एक आठवण, अटॅचमेंट असते. नव:याने दिलेली पहिली साडी, दिवाळीची साडी, सहज आवडली म्हणून घेतलेली साडी, मैत्रिणींबरोबर शॉपिंग करताना घेतलेली साडी अशा साडीच्या आठवणी मनाच्या कुपित असतात.
आईसाठी साडी खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यानंतर एकदा जाणवलं की, दुकानदाराने अनेक साडय़ा दाखवल्या तरी साडी चटकन मनात भरत नाही. एका साडीचा पदरच आवडत नाही किंवा काठतरी. ‘हे असं हवं होतं, ते तसं असतं तर छान दिसलं असतं’ असं मनात सुरू होतं. मग वाटलं की, असं दुकानंच्या दुकानं पालथी घालूनही मनासारखी साडी न घेता हात हलवत येण्यापेक्षा आपणच आपली साडी डिझाइन केली तर काय हरकत आहे? या तिच्या विचारांना धुमारे फुटले ते कांदिवलीच्या चाळीत.
एका टीव्ही शोसंदर्भात संशोधन करण्यासाठी कांदिवली परिसरातील चाळी पालथ्या घालत होते. तेथे रमिलाबेन भेटल्या. ‘आम्हालाही काही काम द्या ना असेल तर..’ असं त्या म्हणाल्या. प्रश्न पडला, काय बरं काम द्यावं यांना? यांना घराबाहेर पडून काम करायचं नाही. घरात बसून फार फार तर शिवणकाम, भरतकाम करतील या. आणि ते त्यांना छान जमतंसुद्धा. म्हणूनच मग ‘फ्युजन साडी’ बनवायचं ठरलं.
‘फ्युजन साडी’ची संकल्पना रमिलाबेन यांच्याकडे मांडली. प्युअर सिल्क, रॉ सिल्क, टिश्यू, कॉटन, सुपरनेट, ब्रोकेड, खणाचं कापड, चंदेरी, ज्यूट अशा विविध कापडांना एकत्र आणून फ्युजन साडी बनवायचं ठरलं. वेगवेगळे पदर, वेगवेगळ्या बॉर्डर्स शिवून साडीला फ्युजन लूक मिळणार होता. त्यासाठी मदतनीस म्हणून रमिलाबेन यांनी परिसरातील गरजू पण शिवणकामात तरबेज बायका निवडल्या आणि अस्तित्वात आली ‘रावी’ची फ्युजन साडी. सुरुवातीला अडचणी आल्या. कारण चाळीतील बायकांना कामात फिनिशिंग आणणं जमत नव्हतं. त्यामुळे काही साडय़ा वाया गेल्या. त्याच्या अक्षरश: पिशव्या शिवल्या गेल्या. पण हळूहळू सारं जमलं आणि फ्युजन साडीचं युगच अवतरलं!
मुंबई, येवला, बनारस येथून निरनिराळे फॅब्रिक्स मागवून, त्यांचा वापर करून साडय़ा डिझाइन करण्यात येऊ लागल्या. चंदेरी साडीला ज्यूटची बॉर्डर, सुपरनेट साडीला ब्रोकेडचा पदर, कॉटन साडीला पैठणी बॉर्डर अशा अनेक नवनवीन फ्युजन साडय़ा ‘रावी’त तयार होतात. रोहित भोसले या कामात मदत करतो. यामुळे दोन फायदे झाले. एक तर गरजू हातांना काम मिळालं आणि वेळेचीही बचत झाली. फ्युजन साडीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही एकच एक साडी घालून कंटाळलात तर मग या साडीचा पदर तुम्ही बदलवू शकता, बॉर्डर बदलवू शकता. म्हणूनच ही साडी कधी जुनी होत नाही.
आपल्या मनासारखी साडी स्वत: तयार करता येणं, यात सुख असते हे खरंच!