49 रुपये वारले. - ऑनलाइन टीम बनवण्याचं व्यसन, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 04:56 PM2020-10-22T16:56:19+5:302020-10-22T16:56:54+5:30

टीम बसवत घरबसल्या थ्रिल  आणि पैसा शोधत आयपीएल पाहणार्‍या  पोराटोरांची जुगार गोष्ट

49 RS died. - Addiction to online team building, beware! | 49 रुपये वारले. - ऑनलाइन टीम बनवण्याचं व्यसन, सावधान!

49 रुपये वारले. - ऑनलाइन टीम बनवण्याचं व्यसन, सावधान!

Next

- श्रेणिक नरदे

क्रि केट हा भारताचा आत्मा आहे. या खेळाचे सर्वाधिक प्रेक्षक आपल्या देशात आहेत. खेळाडूंवरचं प्रेम, कधी टोकाचा तिरस्कार, विजयाचा जल्लोष, तर कधी पराभवामुळे खेळाडूंना धमक्या देण्यापर्यंत प्रेक्षक अतिच इमोशनली या खेळात इन्व्हॉल्व्ह होत जातात.
हे वर्षानुवर्षं चालत आलेलं आहे आणि पुढेही हा वेग असाच राहील किंबहुना याहूनही वाढेल. 
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीलच्या सामन्यांनी तर अक्षरश: भारताला वेडं केलं आहे. यंदा कोरोनाच्या महाभयानक संकटातही आवश्यक त्या उपाययोजना करून दुबईमध्ये हे सामने त्याच उत्साहात खेळवले जात आहेत. 
आपल्या क्रि केटवेड्या देशात खेळाडूंची, खेळाची, अम्पायर, कोच लोकांची जितकी चर्चा चवीनं होत असते तितक्याच चवीनं दबक्या आवाजात क्रि केटवर लावल्या जाणार्‍या सट्टय़ाचीसुद्धा होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत या सट्टय़ाची चर्चा खुलेपणानं होऊ लागली आणि गप्पांतून सरळसरळ आज कोण खेळेल असं वाटतं रे? आज याला कप्तान करायचं की याला व्हाइस कप्तान करायचं? ही चर्चा खुलेआम चालू झाली.  आता हे आपले लोक डिविलियर्स, कोहली, रसेल, धोनी, के.एल. राहुल, कार्तिक, उथप्पा, रोहित शर्मा आणि अशा बर्‍याच खेळाडूंना टीमच्या बाहेरही ठेवू शकतात. आपल्या गल्लीतले लोक असं करू शकतात? 
हो. कुठं? तर मोबाइलमधल्या स्पोर्ट एप्लिकेशनमध्ये. 
फॅण्टसी स्पोर्टस हे एक नवं सट्टय़ाचं व्यासपीठ आज जगभरासाठी खुलं झालं आहे. पूर्वी सट्टा लावणं म्हणजे काहीतरी गुन्हा करणं असं वाटायचं; पण आता भाऊ-बहीण, बाप-लेक, दोस्तलोक एकत्र बसून सट्टा खेळत असतात. आणि त्यात काही वाईट नाही असंही बहुसंख्यांना वाटतं. 
49 रुपये गुंतवले, अँपवर दोन्ही टीममधले योग्य लोक हेरून तुमची टीम निवडली, कर्णधार, उपकर्णधार चांगले खेळले आणि निवडलेल्या टीममधील सर्व खेळाडू उत्तम खेळले तर तुम्ही 49 रुपयांच्या बदल्यात एक कोटी रुपये कमावू शकता अशी इथली लालूच आहे.
 निवडलेले एक-दोन खेळाडू जरी खेळले नाहीत, पहिलं बक्षीस नाही मिळालं तरी खालची बक्षिसं असतातच.
हे सगळं सांगतोय म्हणजे सट्टा खेळायला शिकवण्याचा माझा हेतू नाही; पण अनेकजण कशामागे सध्या पागल झालेत त्यातलं सूत्र तेवढं सांगतो आहे.
टीम अगदीच खराब खेळली तर तुमचे 49 रु पये वारतात. आणि रात्री झोप येत नाही.  थोडक्यातच माझं बक्षीस हुकलं रे. म्हणत तळमळत बसावं लागतं.
दुसर्‍या दिवशी त्याच उत्साहानं परत टीम तयार करायची. खेळायचं. काही जिंकायचं किंवा हारायचं. 
या उत्साहाचा अभ्यास करून तयार झालेले हे फॅण्टसी स्पोर्ट्स अँप्लिकेशन सामान्य लोकांच्या या सट्टा लावण्यातून भरपूर कमाई करू लागले आणि त्या कमाईतील चौथा भाग बक्षीस म्हणून वाटू लागले. 
मात्र या फॅण्टसी टीम तयार करण्यात लाखो लोकांत रोज एखादा यशस्वी ठरतो. आणि निम्म्याहून अधिक लोक आपले पैसे गमावतात. 


रोज यशापयशाची ही साखळी सुरूच असते. रात्री 11-12 वाजेस्तोवर मॅच बघण्याहून जादा आपले पॉइण्ट तपासण्यातच वेळ जात असतो. गल्लीतील कट्टय़ापासून ते मोठय़ा ऑफिसपर्यंत हरेक ठिकाणी क्रि केटचे आधी चाहते असायचे आता सट्टेबाज आहेत. 
या सर्व वातावरणाचा अंदाज घेऊन, यू-ट्यूब आणि टेलिग्राम चॅनल्सना ऊत आला. सट्टा खेळायचा तर त्याचा अभ्यास करणंही आलेच. 
पीच रिपोर्ट, स्पीनर्सना अनुकूल की फास्टर्सना?  कमी लांबीचं मैदान असेल तर कोणता बॅट्समन अधिक स्फोटक बॅटिंग करेल? टॉस जिंकणारी टीम जिंकण्याची आकडेवारी वगैरे याचा अभ्यास असणार्‍या  काही मंडळींनी यू-ट्यूबवरून भविष्यवाणी सुरू केली. तिथं जिज्ञासू सट्टेबाजांच्या उड्या पडताहेत. लाखो सबस्क्रायबर असणारे टेलिग्राम चॅनल्स चालत आहेत. 
कोरोना, आर्थिक मंदीचं वातावरण आदीतून आलेला आर्थिक ताण किंवा ‘असेल माझा हरी तर देईल आणून खाटल्यावरी’ या उक्तीप्रमाणे, गेले तर 49 जातील पण मिळाले कोटभर रुपये तर जिंदगी सेट होईल या आशेतून रोजचे चारपाचशे रुपये घालवणारे बहाद्दरही आहेत. अर्थात, आजची परिस्थितीही काही फारशी चांगली नाही. त्यातून नैराश्य घालवण्यासाठी याकडे आशादायी म्हणूनही काहीजण पाहत असतील तर त्यांना दोष देण्याचंही काही कारण नाही. 
एकानं तर अख्खी दोनशे पानी फुलस्केप वही आणून कोणता फलंदाज कोणत्या गोलंदाजाला ठोकतो, तर कोणता गोलंदाज कुणाची विकेट काढतो याचं ‘अँनेलिसिस’च करून ठेवत आहे. त्या वहीत तो गुंतलेला असताना त्याच्या डोळ्यात जी चमक दिसते ती एखाद्या संशोधकाहूनही काही कमी नसते.
एका मित्रानं सांगितलेला एक किस्सा. एक मॅच सुरू होती, शेवटचे पाचेक ओव्हर बाकी होत्या, तितक्यात एका मित्राचा त्याला फोन आला.
तो म्हणाला, ‘उद्या आपण चारचाकी गाडी आणायला जायचंय, तयार राहा! ’
हा आश्चर्यचकित झाला आणि त्यानं विचारला, ‘कुठून आले एवढे पैसे ?’ 
 तर त्यानं अँप्लिकेशनवर पैसे लावल्याचं आणि आपण 15 लाख रुपये जिंकणार असल्याचं सांगितलं. झालं. यानं अर्ध्यापाऊण तासानं फोन केला तर तो बिचारा म्हणाला,   ‘गाडी कॅन्सल !’
‘का रे? हरला का ?’
  ‘नाही जिंकलो रे.’
  ‘किती ?’
‘साठ रुपये..!’ 
दुसर्‍या दिवशी माझ्या मित्रानं त्याच्या अतिउत्साही दोस्तास दुकानात मिळणारी खेळण्यातली वीस रुपयाची कार भेट दिली.
हे काही प्रातिनिधिक किस्से आहेत. याच्याहून अनेक इरसाल कथा सध्या तरुण पोरं एकमेकांना सांगताना दिसतात.
रोज संध्याकाळी सात वाजता टॉस होतो, कोणते खेळाडू खेळणार याची यादी येते. टेलिग्राम चॅनलवाले तज्ज्ञ दहाएक मिनिटात टीम देतात आणि खाली हॅश टॅग देतात.
सुनो सबकी करो दिलकी
आणि घरोघर बसलेले बरेच रिकामे तरुण हात लागतात पुन्हा एका फसव्या खेळात गुंतायला. 

 

 

 

Web Title: 49 RS died. - Addiction to online team building, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.