वीस वर्षाचे आपणच आपल्यासमोर येऊन उभे राहिलो तर.?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 08:00 IST2020-01-09T08:00:00+5:302020-01-09T08:00:11+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक

वीस वर्षाचे आपणच आपल्यासमोर येऊन उभे राहिलो तर.?
- ऑक्सिजन टीम
ट्वेण्टी ट्वेण्टी. त्या मॅचमध्ये काय नसतं?
जगण्याचं थ्रिल असतं, वेग असतो, बेदरकारपणे उचलून मारणं असतं, झिंग असते, थरार असतो आणि धाडसी निर्णय घेऊन मॅच सुपरओव्हरला जाऊन पार स्टम्पआउट होईर्पयत प्रकरण गेलं तरी मॅच आपल्याच हातात आहे, असं वाटण्याची एक जिगर असते..
तीच जिगर असते वयाच्या विशीत.
वय वर्षे 20.
शिक्षण संपवून साधारण मोठय़ा जगाच्या उंबरठय़ावर उभं राहायचं हे वय.
जगाला भिडायचंच नाही तर नडायचंही असं ठरवून अंगातली रग डोळ्यात उतरवण्याची मस्ती असलेलं वय.
त्या वयात जे जमतं ते पुन्हा कधी आयुष्यात जमत नाही म्हणतात. मग ती दोस्ती असो नाही तर दिल्लगी ! प्रेम प्रकरण असो नाहीतर रुळलेल्या वाटा नाकारून भलत्याच वाटेनं काटेकुटे तुडवत, फुफाटय़ात निघण्याची धमक..
वयाच्या 20व्या वर्षी किंवा विशीत अशी धमक प्रत्येकच तरुण मनांत असते.
तिचं पुढे काय होतं?
जगण्याच्या रगाडय़ात स्वप्न विझतात की फुलतात ही वेगळी गोष्ट; पण विशीतल्या जगण्यानं आयुष्यात जान भरलेली असते हे नक्की.
जगणं टर्न मारून भलतंच डेंजर वळण घेतं ते याच टप्प्यावर..
तोच टप्पा आयुष्यात पुन्हा आला तर?
म्हणजे वीस वर्षाचे आपणच आपल्यासमोर येऊन उभे राहिलो तर.?
येईल स्वतर्ला फेस करता?
काय सांगता येईल स्वतर्ला?
गप्पा मारता येतील की दोष देता येईल?
चार शहाणपणाच्या गोष्टी सांगता येतील की कान टोचता येतील?
असाच एक म्हटलं तर काल्पनिक म्हटलं तर जगण्याचा पुन्हा भिडण्याचा एक प्रयोग ‘ऑक्सिजन’ने या विशेष अंकात करून पाहिला आहे.
आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेल्या, कष्टानं आपला प्रवास करत जगण्याला मनासारखा आकार देणार्या विविध क्षेत्रातल्या नामवंतांशी ‘ऑक्सिजन’ने गप्पा मारल्या, आणि त्यांना विचारला एकच प्रश्न.
समजा, आज 20 वर्षाचे तुम्ही तुम्हालाच वाटेत कुठं भेटलात तर काय सांगाल स्वतर्ला?
- आणि त्यांनी दिली आहेत त्या प्रश्नांची भन्नाट, दिलखुलास उत्तरं!
टुझिरोटुझिरोला भिडताना त्या उत्तरांतून हाती लागेल असं बरंच काही आहे.
हातून राहून गेलेल्या गोष्टींची हुरहुर आहे, उगीच अतिकाळजी केल्याची चुटपुट आहे, चुकीचे निर्णय घेतल्याचा पस्तावा आहे आणि बाकी सगळ्या रगाडय़ात स्वतर्कडे, स्वतर्च्या प्रकृतीकडे पुरेसं लक्ष न दिल्याचा पश्चातापही आहे.
गप्पा मारता मारता काही मान्यवरांनी रूळ बदलल्याचंही तुम्हाला जाणवेल. आपण वीस वर्षाचे होतो, तेव्हाच्या ‘स्वतर्’शी गप्पा मारता मारता अनेकांनी आज विशीत असलेल्यांनाही चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
नव्याकोर्या वर्षासाठी यापेक्षा मस्त गिफ्ट दुसरी कुठली असेल का?