प्रश्न पडतीलच अरे; पण पाऊल तर उचलावं लागेलच ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 08:00 IST2020-01-09T07:55:05+5:302020-01-09T08:00:14+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक

प्रश्न पडतीलच अरे; पण पाऊल तर उचलावं लागेलच ना!
- अमेय वाघ
अमेय.. किती लहान दिसतोस अरे तू.. इतका कसा बारीक आहेस? त्यावर काहीतरी कर.
आणि जरा चिडचिड कमी कर, त्याचा तुलाच फायदा होईल. तुझ्या मतांवर तू ठाम आहेस आणि ती मांडताना तू काहीसा अॅग्रेसिव्ह होतोस.
अर्थात मतांवर ठाम आहेस ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु थोडं अॅग्रेशन कमी केलंस तर कदाचित तुझी मतं समोरच्याला शांतपणे सांगू शकशील. आणि त्यांना ती पटतीलही.
तुला अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईला जायचंय; परंतु हिंमत होत नाहीये. तिकडे आपलं कसं होईल, आपल्याला हवं ते आपल्याला करता येईल का, असे असंख्य प्रश्न तुझ्या मनात घुटमळताहेत, हे कळतंय मला.
पण मी तुला एवढंच सांगतो की तुझ्या शंका, तुझे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, पण मित्ना, पुढे जाण्यासाठी कधीतरी पाऊल उचलावंच लागणार आहे. तू हे पाऊल उचलताना भविष्याचा विचार कर.
अडचणी येतील त्यांना सामोरे जाण्याची ताकद तुझ्यात आहे, फक्त ती तू आजमावत नाहीयेस. ती एकदा आजमावून बघ, तुझं जग वेगळंच असेल.
तू जे काम करतोय ते तू खूप मनापासून आणि निरागस भावनेने करतोस. कदाचित पुढच्या काही काळात ही निरागसता कमी होईल. परंतु ती जपण्यासाठी प्रयत्न कर. ती निरागसता हीच तुझी ताकद आहे.
अजून एक, तुझ्या आयुष्यात तुला मिळालेलं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. ते सांभाळून ठेव, ते प्रेम तुला ताकद देईल. तुला पुढे जाण्यासाठी मदत करेल. एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही मोठा झालास तरी दुसर्याला कमी समजू नकोस. तुझ्या कामाबरोबरच इतरांचं कामसुद्धा बघ, त्यातून नक्कीच तुला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. तुझ्यातली जिद्द आणि कामाप्रतिची तळमळ कायम ठेव. यश तुला मिळत राहील.