झिम्बाब्वे काढला पाकचा घामटा
By Admin | Updated: March 2, 2015 00:52 IST2015-03-02T00:52:22+5:302015-03-02T00:52:22+5:30
वहाब रियाजची अष्टपैलू कामगिरी व मोहम्मद इरफानचा अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत झिम्बाव्बेचा

झिम्बाब्वे काढला पाकचा घामटा
ब्रिस्बेन : वहाब रियाजची अष्टपैलू कामगिरी व मोहम्मद इरफानचा अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत झिम्बाव्बेचा २० धावांनी पराभव केला आणि २०१५ च्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली.
भारत व वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघावर झिम्बाब्वेविरुद्धही पराभवाची नामुष्की ओढवणार, असे चित्र होते. पाकिस्तान संघाला ७ बाद २३५ धावांची मजल मारता आली. पाकच्या डावात कर्णधार मिसबाह उल-हक (१२१ चेंडू ७३ धावा) आणि वहाब रियाज (४६ चेंडूंत नाबाद ५४ धावा) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रियाजने गोलंदाजीमध्येही छाप सोडताना ४५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याला मोहम्मद इरफानची (४-३०) योग्य साथ लाभली.
झिम्बाब्वेपुढे मोठे लक्ष्य नसले तरी ३० ते ४० षटकांदरम्यान त्यांनी ५ विकेट गमाविल्यामुळे ते बॅकफूटवर आले. झिम्बाब्वेचा डाव ४९.४ षटकांत २१५ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेतर्फे ब्रेन्डन टेलरने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.
पाकिस्तान संघाचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. या निकालामुळे ‘ब’ गटात पाकिस्तान संघाला गुणतालिकेतील स्थानात सुधारणा करण्यात यश मिळाले. चौथा सामना खेळणाऱ्या झिम्बाब्वे संघाला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
आजच्या लढतीत पाक संघाची भिस्त गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून होती. इरफानने झिम्बाब्वेचे दोन्ही सलामीवीर चामू चिभाभा (९) आणि सिकंदर रजा (८) यांना सातव्या षटकात माघारी परतवले. टेलरने त्यानंतर हॅमिल्टन मासकाद््जा (२९) व सीन विलियम्स (३३) यांच्या साथीने अनुक्रमे ५२ व ५४ धावांची भागीदारी केली. इरफानने मासकाद््जाला बाद केले. मिसबाहने त्याचा झेल टिपला.
रियाजने टेलरचा अडथळा दूर केला. क्रेग इर्विन (१४) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार एल्टन चिगुंबुराने (३५) संघर्ष केला, पण संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरला. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर नासीर जमशेद (१) आणि अहमद शहजाद (०) माघारी परतले त्यावेळी धावफलकावर केवळ ४ धावांची नोंद होती. त्यानंतर मिसबाहने संयमी फलंदाजी करीत हारिस सोहेलसोबत (४४ चेंडू २७ धावा) ५४ धावांची तर उमर अकमलसोबत (४२ चेंडू ३३ धावा) ६९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.
पाकिस्तानची धावगती संथ होती. रियाज खेळपट्टीवर आल्यानंतर पाकिस्तानच्या धावगतीला वेग आला. त्याने अर्धशतकी खेळी ६ चौकार व एका षटकाराने सजवली. त्याआधी शोएब मकसूदने २१ धावांची खेळी केली, पण शाहिद आफ्रिदीने (०) पुन्हा एकदा निराशा केली. विश्वकप स्पर्धेत वाढदिवसाच्या दिवशी शून्यावर बाद होणारा तो दुसरा फलंदाज ठरला.