युवराजच्या वडिलांना अटक ; जामीन मंजूर
By Admin | Updated: August 26, 2014 03:05 IST2014-08-26T03:05:52+5:302014-08-26T03:05:52+5:30
कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़

युवराजच्या वडिलांना अटक ; जामीन मंजूर
चंदीगड : कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर भारताचा अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली; मात्र नंतर योगराज यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़
पंचकुला पोलीस ठाण्याचे उपायुक्त राहुल शर्मा यांनी सांगितले की, क्रिकेटनंतर अभिनयाकडे वळलेल्या योगराज सिंह यांच्यावर रविवारी रात्री उशिरा कार पार्किंगवरून झालेल्या भांडणानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यानंतर अतिक्रमण आणि धमकी देण्याच्या भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे;मात्र त्यानंतर पंचकुलातील सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे़
योगराज सिंह आपली चुलत बहीण कुलजित कौर त्यांची मुले आणि अन्य नातेवाईकांसह रविवारी रात्री एका जन्मदिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन घरी परतल्यानंतर पंचकुला येथील त्यांच्या निवासस्थानी कार पार्किं ग करताना शेजारी असलेल्या निवृत्त डीएसपी आणि त्यांच्या दोन मुलांनी यावर आक्षेप घेतला़ शर्मा यांनी सांगितले की, पार्किंगच्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला़ तक्रारदारांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार योगराज सिंह आणि त्यांच्या मित्रांनी डीएसपी आणि त्यांच्या मुलांना मारहाण केली, तर योगराज यांनी डीएसपी आणि त्यांच्या मुलांनी नातेवाईकांना मारहाण केल्याचे म्हटले आहे़ यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे योगराज यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)