युवराज सिंगच्या वडिलांना कर्करोग
By Admin | Updated: June 5, 2014 12:10 IST2014-06-05T12:09:52+5:302014-06-05T12:10:04+5:30
तडाखेबाज क्रिकेटपटू युवराज सिंग हा कर्करोगावर मात करुन नव्या उमेदीने मैदानावर परतला असतानाच युवराजनंतर त्याचे वडिल व माजी क्रिकेटपटू योगराज यांनाही कर्करोगाने ग्रासले आहे.

युवराज सिंगच्या वडिलांना कर्करोग
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - तडाखेबाज क्रिकेटपटू युवराज सिंग हा कर्करोगावर मात करुन नव्या उमेदीने मैदानावर परतला असतानाच युवराजनंतर त्याचे वडिल व माजी क्रिकेटपटू योगराज यांनाही कर्करोगाने ग्रासले आहे. योगराज यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे युवराजच्या कुटुंबियांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार योगराज सिंग यांच्यावर सध्या अमेरिकेतील न्यूयॉकमधील एका ख्यातनाम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगराज यांना घसादुखी व खोकल्याचा त्रास जाणवत होता. औषध घेतल्यावर योगराज यांना बरे वाटत असल्याने याकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही. मात्र काही महिन्यांपासून योगराज यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच खोकलाही वाढ लागला. तपासणीत योगराज यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. योगराज यांना स्वरतंतूचा (व्होकल कॉर्ड) कर्करोग झाला होता. २० दिवसांपूर्वी योगराज यांच्यावर न्यूयॉर्कमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी योगराज यांच्या घशातून ट्यूमर काढला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे योगराज यांची पत्नी सतवीर सिंग यांनी सांगितले. यातून पूर्णपणे रिकव्हर झाल्याशिवाय योगराज यांना बोलण्यास मनाई असल्याचे त्यांनी संबंधीत इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.
दरम्यान, युवराज सिंगलाही २०११ मध्ये कर्करोग झाला होता. त्याच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात केमोथेरपी करण्यात आली होती. या जीवघेण्या आजारावर जिद्दीने मात करत युवराज नुकताच मैदानात परतला आहे. युवराजने वडिलांना त्याच रुग्णालयात उपचार घेण्यास सांगितले होते. मात्र योगराज यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल्यानुसार न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार घेतले. उपचार घेत असतानाही योगराज यांचे क्रिकेटवरील प्रेम अद्यापही दिसून येते. योगराज यांनी त्यांचा शिष्य व किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनन व्होराला त्याच्या धमाकेदार खेळीसाठी व्हॉट्स अॅपवरुन शुभेच्छा दिल्या.