युकी, सोमदेव पराभूत
By Admin | Updated: September 13, 2014 00:48 IST2014-09-13T00:48:25+5:302014-09-13T00:48:25+5:30
सोमदेव देवबर्मन व युवा टेनिसपटू युकी भांबरी यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत भारतीय संघ सर्बियाविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर पडला आहे.

युकी, सोमदेव पराभूत
बंगलोर : भारतातील एकेरीचा अव्वल खेळाडू सोमदेव देवबर्मन व युवा टेनिसपटू युकी भांबरी यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत भारतीय संघ सर्बियाविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर पडला आहे. युकी भांबरीला सलामी लढतीत सर्बियाच्या दुसान लोजोविचविरुद्ध ३-६, २-६, ५-७ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारताची आशा सोमदेवच्या कामगिरीवर केंद्रित झाली होती; पण त्याला जागतिक क्रमवारीत १०७ व्या स्थानावर असलेल्या फिलिप क्राजिनोव्हिचविरुद्ध ६-१, ४-६, ६-३, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे सर्बियाने या लढतीत २-० अशी आघाडी घेतली आहे.
त्याआधी, आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ज्युनिअर गटात जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या व जागतिक क्रमवारीत १५३व्या स्थानावर असलेल्या भांबरीने जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानावर असलेल्या लाजोविचविरुद्ध सपशेल शरणागती पत्करली. युकीने पहिले दोन सेट ३-६, २-६ अशा फरकाने गमाविले. तिसऱ्या सेटममध्ये युकीने संघर्ष केला; पण अखेर त्याला ७-५ ने सेट गमवावा लागला. या लढतीत विजय मिळवीत सर्बियाने १-० ने आघाडी घेतली.
युकीला यंदाच्या मोसमात खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही. त्यापुढे शानदार फॉर्मात असलेल्या खेळाडूला पराभूत करण्याचे आव्हान होते. लाजोव्हिचने यंदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
युकीने या लढतीत अनेक टाळण्याजोग्या चुका केल्या. त्याचप्रमाणे त्याला मोक्याच्या क्षणी गुण वसूल करण्यात अपयश आले. युकीने ५९ टाळण्याजोग्या चुका केल्या; तर त्याला नऊपैकी केवळ दोनदा ब्रेक पॉइंटचा लाभ घेता आला. भारताला लढतीत पुनरागमन करून देण्याची जबाबदारी आता सोमदेव देवबर्मनवर आहे. सोमदेवला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत सर्बियाच्या फिलिप क्राजिनोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
आज खेळल्या गेलेल्या लढतीत उभय खेळाडूंना भेदक सर्व्हिस करण्यात अपयश आले. युकीने तिसऱ्या गेममध्ये सामन्यातील पहिला ब्रेक पॉइंट मिळवीत प्रतिस्पर्ध्याला आश्चर्यचकित केले. युकीने शानदार कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस भेदण्यात यश मिळविले.
भारतीय संघ व स्टेडियममध्ये उपस्थित जवळजवळ २५०० प्रेक्षकांना हा आनंद फार वेळ उपभोगता आला नाही. त्यानंतरच्या गेममध्ये युकीने एकही गुण न मिळविता सर्व्हिस गमाविली. युकी चुका टाळण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)