विश्वचषक भारत जिंकेल

By Admin | Updated: November 22, 2014 02:04 IST2014-11-22T02:04:04+5:302014-11-22T02:04:04+5:30

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या

World Cup wins India | विश्वचषक भारत जिंकेल

विश्वचषक भारत जिंकेल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांनी आज, शुक्रवारी भारतीय संघाला आगामी आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘२०१५चा विश्वचषक’ भारतीय संघच जिंकेल, अशी आशा व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २०१३-१४ च्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण आज मुंबईत करण्यात आले. यावेळी वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेंगसरकर म्हणाले, आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला घवघवीत यश मिळेल, यासाठी माझ्या शुभेच्छा. आशा करतो की, या मालिकेच्या अनुभवाच्या बळावर भारत विश्वचषकाचे जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होईल.
५८ वर्षीय वेंगसरकरांनी ११६ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७५-७६ मध्ये नागपूर येथे इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या वेंगसरकर यांनी शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. १९८३च्या विश्वचषक विजयी आणि १९८५च्या चॅम्पियन्स चषक विजयी संघात त्यांचा समावेश होता. तसेच २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी भारताच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वेंगसरकर म्हणाले, या आनंदाच्या क्षणी माझ्या शाळेचे किंग जॉर्ज (राजे शिवाजी) ज्यांच्याकडून मी पहिल्यांदा ‘गाईल्स आणि हॅरिस’ शिल्ड स्पर्धेत खेळलो त्यांचे आभार व्यक्त करतो. पोद्दार कॉलेजचे विशेष आभार. त्यांच्यामुळे भारतीय संघाचे आणि भारतीय विद्यापीठ संघाचे कर्णधारपद भूषविण्याची मला संधी मिळाली. विद्यापीठाच्या संघाकडून १९७७ मध्ये एमसीसी संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळाला. तसेच दादर युनियन क्लबला विसरून चालणार नाही. मुंबई आणि भारतीय संघाकडून खेळतानाच्या अनेक आठवणी या क्लबशी जोडलेल्या आहेत.
मुंबई आणि भारतीय संघात खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि हे दोन्ही पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक डाव, प्रत्येक सामना, प्रत्येक मालिका आणि प्रत्येक दौऱ्याचा मनमुरादपणे आनंद लुटल्याचे वेंगसरकर सांगतात. (प्रतिनिधी)

Web Title: World Cup wins India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.