Maharashtra Girl World Record,: जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत दिव्या देशमुखने धमाकेदार विजय मिळवला आणि विश्वचषक विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. त्यामुळे मूळ सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला. आज, सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राउंडमध्ये जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह सुरुवात केली. आक्रमक खेळ करत तिने जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी आधी बरोबरी साधली. मग रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरूला पराभवाची धूळ चारली.
बुद्धिबळ तज्ज्ञांच्या मते, दिव्याची तयारी उत्कृष्ट होती. स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने सामन्यापूर्वी सांगितले होते की कोनेरू हम्पी खूप मजबूत आहे, परंतु सध्या मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या दिव्याच्या बाजूने माप झुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यांचे म्हणणे खरे ठरले. मोठी गोष्ट म्हणजे दिव्या आणि हम्पी दोघींनीही चीनच्या खेळाडूंना हरवून अंतिम फेरी गाठली होती.
विजेत्यासाठी मोठी बक्षिसे रक्कम
FIDE महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यातील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३५,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे मिळणार आहेत. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे. अशा परिस्थितीत, त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रायोजक मिळण्याची अपेक्षा आहे.