कोण होईल चौसष्ट घरांचा ‘प्रिन्स’?
By Admin | Updated: October 6, 2014 12:08 IST2014-10-06T03:23:26+5:302014-10-06T12:08:15+5:30
ज्युनिअर गटामधील चौसष्ट घरांचा राजा कोण, याचे उत्तर पुण्यात रंगणाऱ्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेतून (डब्ल्यूजेसीसी) मिळणार आहे

कोण होईल चौसष्ट घरांचा ‘प्रिन्स’?
पुणे : ज्युनिअर गटामधील चौसष्ट घरांचा राजा कोण, याचे उत्तर पुण्यात रंगणाऱ्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेतून (डब्ल्यूजेसीसी) मिळणार आहे. अहमदनगर रोडवरील हॉटेल हयातमध्ये होत असलेल्या स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. उद्या (रविवार) पासून प्रत्यक्ष लढतींना प्रारंभ होईल.
व्लादिमीर फेडोसीव (रशिया, २६६१ रेटिंग गुण) आणि मुलींमध्ये अलेक्झांड्रा गोर्याचकिना (रशिया, २४३०) यांना अनुक्रमे खुल्या आणि मुलींच्या गटात अव्वल मानांकन असून, त्यांना विजेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. खुल्या गटात १३५ खेळाडू आहेत, तर ४५ देशांतून आलेल्या ७५ मुलींमध्ये वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियन आणि वर्ल्ड ज्युनिअर गर्ल्स चॅम्पियन स्पर्धांसाठी सामने होतील. खुल्या आणि महिला गटात विजेतेपद मिळविणाऱ्या बुद्धिबळपटूंना ग्रँडमास्टर आणि वूमन ग्रँडमास्टर किताब दिले जातील. हे विजेते आगामी वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. याशिवाय विजेत्यांना ६ लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळणार आहे. दोन्ही गटांतील सर्वाेत्तम भारतीय बुद्धिबळपटूंना विशेष पारितोषिक म्हणून पुणे महापौर चषक देण्यात येईल. या पारितोषिकांबरोबरच खेळाडूंसाठी जीएम, आयएम, डब्ल्यूजीएम व डब्ल्यूआयएमसाठीचे नॉर्म्सही पणाला लागणार आहेत.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा विचार करता मुलांमधून महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी आणि मुलींमधून ओडिशाची महिला ग्रॅण्डमास्टर पद्मिनी राऊत यांच्यावर मुख्य मदार असेल. नाशिकच्या विदितला या स्पर्धेत खुल्या गटातून चौथे, तर मुलींमधून पद्मिनीला सहावे मानांकन आहे. दिल्लीचा ग्रॅण्डमास्टर सहज ग्रोवर, इंटरनॅशनल मास्टर दिप्तायन घोष, ग्रॅण्डमास्टर अंकित राजपाडा, इंटरनॅशनल मास्टर मुरली कार्तिकेयन, पुण्याची ऋचा पुजारी, पी. व्ही. नंदिता, इवाना मारिया फुर्ताडो, आर. वैशाली या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबाबतही उत्सुकता आहे.
स्पर्धेचे उद्घाटन लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांच्या हस्ते झाले. यावेळी फिडेचे प्रतिनिधी रॉबर्ट झिफ्कोव्हिस्स, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि डब्ल्यूजेसीसीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयराज पाठक, आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा ६ ते १९ तारखेदरम्यान स्विस लीग पद्धतीने खेळली जाणार असून, त्यात दररोज एक फेरी याप्रमाणे १३ फेऱ्या असतील. (क्रीडा प्रतिनिधी)