चौथा कोण? आज ठरणार
By Admin | Updated: March 9, 2015 01:04 IST2015-03-09T01:04:55+5:302015-03-09T01:04:55+5:30
‘अ’ गटात आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला इंग्लंड संघ आणि थोडेसे परिश्रम आणि थोडी नशीबाची साथ मिळाल्यामुळे ६ गुणासह

चौथा कोण? आज ठरणार
अॅडिलेड : ‘अ’ गटात आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला इंग्लंड संघ आणि थोडेसे परिश्रम आणि थोडी नशीबाची साथ मिळाल्यामुळे ६ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर असलेला बांगलादेश यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना या आज विजय मिळविणे आवश्यक आहे.
‘अ’ गटातून न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडबरोबरचा शेवटचा सामना जिंकून श्रीलंकाही ८ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत पोहचेल. त्यामुळे या गटातील बाद फेरीतील चौथा संघ कोण? याचे उत्तर आजच्या सामन्यातून मिळणार आहे.
२०११ च्या विश्वकप स्पर्धेत इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध दोन विकेटस्ने पराभव स्वीकारावा लागला होता, तरी इंग्लंड संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. यावेळी मात्र इंग्लंडपुढे ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. इंग्लंडने आतापर्यंत कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध (आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका) तीन सामने गमावले आहेत. त्यांनी एकमेव विजय स्कॉटलंडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध मिळविलेला आहे.
श्रीलंकेविरुद्ध यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत इंग्लंडला ३१० धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आले. प्रतिस्पर्धी संघाने १६ चेंडू व ९ गडी राखून विजय साकारला. इंग्लंडला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. इंग्लंडतर्फे मोईन अलीने स्कॉटलंडविरुद्ध तर जो रुटने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली आहे. यांच्या व्यतिरिक्त इंग्लंड संघातील केवळ दोघांनी या स्पर्धेत अर्धशतकी खेळी केलेली आहे. कर्णधार इयोन मोर्गनने या स्पर्धेत केवळ २२.५० च्या सरासरीने केवळ ९० धावा फटकाविल्या आहेत. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. अँडरसनने या स्पर्धेत ९१ च्या सरासरीने केवळ २ बळी घेतले आहे.