१६ वर्षांची असताना त्याने ड्रग्स दिले, अत्याचारही केला! दिवंगत फुटबॉलपटूवर ३७ वर्षीय महिलेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 10:22 IST2021-11-24T10:19:01+5:302021-11-24T10:22:35+5:30
ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही.

१६ वर्षांची असताना त्याने ड्रग्स दिले, अत्याचारही केला! दिवंगत फुटबॉलपटूवर ३७ वर्षीय महिलेचा आरोप
ब्यूनस आयर्स : फुटबॉल विश्वाचा माजी सम्राट दिवंगत दिएगो मॅरेडोना (Diego Maradona) यांच्यासोबत ‘लिव्ह इन’ राहिलेल्या क्यूबाची ३७ वर्षांची माविस अल्वारेज (Mavis Alvarez) हिने त्यांच्यावर ड्रग्ज सेवनाची सवय लावणे, तसेच शारीरिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप केला. अर्जेंटिनाच्या न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी दाखल झालेल्या या महिलेने मी १६ वर्षांची असताना लैंगिक शोषण सुरू झाल्याचे म्हटले आहे.
ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही. फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मॅरेडोनाने ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले. मृत्यूच्या दाढेत असताना कॅस्ट्रो यांच्या निमंत्रणावरून कोकेनपासून सुटका करण्याच्या उपचारासाठी अनेक वर्षे क्यूबामध्ये वास्तव्य केले.’
अल्वारेज मागच्या आठवड्यापासून ब्यूनस आयर्समध्ये आहे. मॅरेडोनाचा मागच्या नोव्हेंबरमध्ये मृत्यू झाला. तथापि, महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढणारे काही वकील मॅरेडोनाच्या सहकाऱ्यांना टार्गेट करीत आहेत.
अल्वारेज म्हणाली, ‘मी १६ वर्षांची तर मॅरेडोना ४० वर्षांचा होता. तो क्यूबामध्ये रहायचा. अमली द्रव्य सेवनाची सवय सोडणारे उपचार घेत असताना त्याने माझ्यावर बलात्कार केला. ‘त्याने माझे बालपण’ हिरावून घेतले! आमचे संबंध चार- पाच वर्षे चालले. या काळात त्याने अमानुष मारहाण आणि अत्याचारही केले. मी त्याच्यावर प्रेम करायची आणि त्याचा तिरस्कारदेखील! अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आला. इतकी वर्षे मौन पाळल्यानंतर मी का बोलते आहे, असे अनेकांना वाटत असावे. पण मॅरेडोनाच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना टीव्हीवर ज्या मालिका दाखविल्या जात आहेत, त्यात हे प्रकरण असावे असे मला मनापासून वाटले.’