पहिलीच वन डे धोक्यात, वेस्ट इंडीज संघ संपावर जाणार ?
By Admin | Updated: October 8, 2014 11:13 IST2014-10-08T10:13:37+5:302014-10-08T11:13:34+5:30
कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

पहिलीच वन डे धोक्यात, वेस्ट इंडीज संघ संपावर जाणार ?
ऑनलाइन लोकमत
कोची, दि. ८ - कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचे अस्त्र उगारले आहे. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या मालिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
वेस्ट इंडीज संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी ही मालिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. मात्र या मालिकेच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड व खेळाडूंमध्ये करारावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. क्रिकेट बोर्डाने केलेल्या नवीन करारात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये भरभक्कम कपात करण्यात आली आहे. बोर्डाच्या या करारामुळे संघाचे मनोबल घटले असून परिस्थितीवर तोडगा निघाला नाही तर खेळाडू स्वतःच्या हातात सूत्र घेतील असे वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्होने एका पत्रात म्हटले आहे. वेस्ट इंडीज संघाने मंगळवारी सरावही केला नव्हता तसेच त्यांनी पत्रकार परिषदेला येणे टाळले होते. वेस्ट इंडीज क्रिकेटपटूंनी संपाचा इशारा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला पत्र पाठवून माफी मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आमचे खेळाडू पहिल्या सामन्यात सहभागी होणार नसून यामुळे होणा-या नुकसानासाठी चाहते व बीसीसीआयची आम्ही माफी मागतो असा स्पष्ट उल्लेख केल्याचे समजते.