बांगलादेशला नमवून वेस्ट इंडिज अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत
By Admin | Updated: February 11, 2016 19:27 IST2016-02-11T19:27:29+5:302016-02-11T19:27:29+5:30
अंडर १९ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

बांगलादेशला नमवून वेस्ट इंडिज अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत
ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. ११ - अंडर १९ वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांची गाठ भारताशी आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २२६ धावा केल्या. वेस्ट इंडिजने आठ चेंडू आणि तीन गडी राखून हे आव्हान पार केले.
वेस्ट इंडिजच्या या विजयामुळे शेर-ए-बांगला स्टेडियमवर आलेल्या दहाहजार चाहत्यांची निराशा झाली. वेस्ट इंडिजचा डाव सुस्थितीत असताना संघाच्या १४७ धावा झालेल्या असताना कर्णधार शिमरॉन ६० धावांवर बाद झाला. त्यानंतर दबावाखाली आलेल्या वेस्ट इंडिजचे आणखी दोन गडी फक्त ३४ धावात बाद झाले.
पण अष्टपैलू शामार स्प्रिनजरने नाबाद ६२ धावा करत वेस्ट इंडिजची नौका किना-याला लावली. गोलंदाजी करतानाही स्प्रिंजरने किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने दहा षटकात ३६ धावा देत दोन गडी बाद केले. बांगलादेशकडून मेहेंदी हसन मिराजने कर्णधारपदाला साजेशी ६० धावांची खेळी केली. पण त्याचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली.
वेस्टइंडिजच्या संघाने दुस-यांदा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी मिरपूरमध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये अंतिम सामना होईल.