सुवर्णयुगाच्या शोधात वेस्ट इंडीज
By Admin | Updated: February 14, 2015 18:05 IST2015-02-14T18:05:39+5:302015-02-14T18:05:39+5:30
क्रिकेटचा शोध भलेही इंग्लंडने लावला असला तरी त्यावर सुरवातीपासून अधिराज्य केले ते वेस्ट इंडीजने

सुवर्णयुगाच्या शोधात वेस्ट इंडीज
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">विश्वास चरणकर, कोल्हापूर
क्रिकेटचा शोध भलेही इंग्लंडने लावला असला तरी त्यावर सुरवातीपासून अधिराज्य केले ते वेस्ट इंडीजने. उंच, धिप्पाड, काटक आणि बलदंड शरीराच्या खेळाडूंनी भरलेला संघ मैदानावर उतरला की विरोधी संघाचे अर्धे पतन व्हायचे. उरलेले काम तोफखान्यासारखी गोलंदाजी किंवा हातात बॅट घेऊन आलेले समशेर बहाद्दर करायचे. पण काळाच्या ओघात विंडीजचे हे सर्व वैभव लयाला गेले. आज विंडीज संघाची गिनती दुबळय़ा संघात केली जाते. आपण दुबळे नाही, आजही आपल्यात तीच रग, तीच धग आहे, हे दाखवून देण्याची संधी वेस्ट इंडीजला आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला १९२६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे सदस्यत्व मिळाले. १९२८ला त्यांनी इंग्लंडविरुध्द पहिला कसोटी सामना खेळला. १९७0 ते १९९0 हा वेस्ट इंडीयन क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. या काळात त्यांनी दोनदा विश्वविजेतेपद तर एकदा उपविजेतेपद मिळवले. वेस्ट इंडीजचे सर्वात यशस्वी कर्णधार क्लाईव्ह लॉईड याच्या नेतृत्त्वाखालील संघाने १९७५ आणि १९७९ असा सलग दोनदा विश्वचषक जिंकला. १९८३ला ते हॅटट्रीक करणार होते. परंतु कपिलदेवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अनपेक्षितपणे त्यांना पराभवाचा धक्का दिला. विंडीज क्रिकेटचा चिरेबंद वाडा ढासळण्याची ती सुरवात होती.
१९९0 नंतरच्या काळात विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली. क्रिकेटमधील त्यांचा दबदबा कमी आला. परिणामी चाहत्यांची संख्या घटू लागली. याच काळात अमेरिकेन बेसबॉलची लोकप्रियता कॅरेबियन बेटांवर पोहचली. या खेळात मिळणारा पैसा कॅरेबियन तरुणांचे डोळे दिपवू लागला. साहजिकच येथील तरुणांच्या हातात क्रिकेट बॅटऐवजी बेसबॉलची बॅट दिसू लागली. अमेरिकेच्या एनबीए लीगसारख्या स्पर्धा कॅरेबियन तरुण गाजवू लागला.
याच दरम्यान विंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधन आणि इतर कारणांवरुन वादाचे अनेक प्रसंग उद्भवले. ही प्रकरणे अगदी अलीकडील भारत दौर्यापर्यंत येवून थांबतात. परिणामी विंडीजमधील क्रिकेटचे वाटोळे झाले. त्यांच्या संघाची क्रमवारी तळात गेली. अगदी बांगलादेशानेही त्यांना त्यांच्या देशात येऊन बदडले.
वेस्ट इंडीज संघाच्यादृष्टीने जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे ख्रिस गेलच्या रुपाने जगातील सर्वात स्फोटक फलंदाज आहे. अशक्यप्राय विजय खेचून आणण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्या जोडीला लेंडील सिमोन्स, डवेन स्मिथ, मालरेन सॅम्युएल, ब्रायन लाराची प्रतिकृती असलेला डॅरेन ब्राव्हो, यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीन, अष्टपैलू फिनिशर डॅरेन सॅमी अशी फलंदाजांची मजबूत फळी आहे. पण यांच्या कामगिरीत सातत्य नाही. जर यांनी सातत्यपूर्ण सांघिक कामगिरी केली तर ते धावांचा डोंगर सहज रचू शकतात.
गोलंदाजीत केमार रोच, जेरॉम टेलर, कर्णधार होल्डर मिलर, शेल्डन कॉटरेल आंद्रे रसेल यांची धार गार्नर, मार्शल, होल्डिंग या परंपरेतील नसली तरी जलद खेळपट्यांवर वर्चस्व गाजवू शकतात. वादग्रस्त शैलीमुळे आयसीसीने बंदी घातलेल्या सुनील नरेनच्या जागी सुलेमान बेन कितपत यशस्वी ठरतो हा प्रश्नच आहे.
कॅरेबियन जनता अतिशय क्रिकेटप्रेमी आहे. क्रिकेट ‘एन्जॉय’ करावे तर ते कॅरेबियन लोकांनीच. हातात ‘ग्लास’ आणि पॉप म्युझीकवर चालणारा सांबा डान्स हे दृष्य स्टेडीयममध्ये सर्रास नजरेस पडते. पण संघाची कामगिरी ढासळत गेली तशी प्रेक्षकांची संख्याही रोडावत गेली. या सर्वांना संजीवनी देण्यासाठी विश्वचषकासारखा पर्याय नाही. तसे झाल्यास विंडिजच्या सुवर्णयुगाचा पुन:प्रारंभ ठरेल.
४वेस्ट इंडीज हा संघ विविध देशांच्या समुह आहे. अंटिग्वा-बर्म्युडा, बार्बाडोस, डोमेनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट किटस-नेविस, सेंट ल्युसिया, सेंट व्हिन्सेट आणि ग्रेनेडीयन त्रिनिनिदाद-टोबेगो हे ते देश आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूचा देश वेगळा, पंतप्रधान वेगळा ध्वज वेगळा, राष्ट्रगीत वेगळे त्यांचा प्रत्येकाचा संघ एकमेकांविरुध्द खेळतो, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ते एक संघ म्हणून खेळतात.
४२0१५ च्या विश्वचषकात सहभागी झालेल्या वेस्ट इंडीज संघाची धुरा २३ वर्षीय जेसन होल्डर या अतिशय नवख्या खेळाडूच्या हाती आहे. मानधन प्रश्नावरुन डवेन ब्राव्होने भारत दौरा संघासमवेत सोडला आणि या बंडखोरीचे फळ म्हणून त्याला आधी कर्णधारपदावरुन आणि नंतर वर्ल्डकप संघातून डच्चू देण्यात आला.
४त्याच्या जागी मध्यमगती गोलंदाज होल्डरला नेता बनविण्यात आले. होल्डर हे आयपीएलचे ‘प्रॉडक्ट’ आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो. धोनीच्या सोबत राहून त्याने किती नेतृत्व गुण आत्मसात केले आहेत हे आता दिसून येईल.
४दोन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्या होल्डरने आतापर्यंत केवळ २६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात १६२ धावा आणि ३७ बळी ही त्याची कमाई.
४यंदाच्या स्पर्धेतील कसोटी दर्जाप्राप्त संघांपैकी तो सर्वात अनुभवहिन कर्णधार असावा. तो आता संघाला कसे प्रेरीत करतो ते पहावे लागेल.