वेस्ट इंडीजचा धुव्वा
By Admin | Updated: February 28, 2015 01:32 IST2015-02-28T01:32:17+5:302015-02-28T01:32:17+5:30
मेलबर्नच्या मैदानात जे वादळ अर्ध्यावरच शमले होते, ते आज सिडनीच्या मैदानावर धडकले. या वादळाचं नाव आहे, ए. बी. डिव्हिलिअर्स

वेस्ट इंडीजचा धुव्वा
सिडनी : मेलबर्नच्या मैदानात जे वादळ अर्ध्यावरच शमले होते, ते आज सिडनीच्या मैदानावर धडकले. या वादळाचं नाव आहे, ए. बी. डिव्हिलिअर्स. रविवारी भारताविरुध्द तो लवकर बाद झाला होता. भारताविरुध्दच्या पराभवाचे जे शल्य त्याच्या मनात खोलवर रुतले होते, ती भडास त्याने आज वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर काढली. आज त्याने धुव्वाधार फलंदाजी करताना केवळ ६४ चेंडूत एकदिवसीय सामन्यातील वेगवान दीेडशतक ठोकले. त्याच्या १६२ धावा आणि इम्रान ताहिरच्या जादुई फिरकीच्या बळावर द. आफ्रिकेने ब गटात शुक्रवारी वेस्ट इंडीजवर तब्बल २५७ धावांनी विजय मिळविला. विश्वषकाच्या इतिहासात हा संयुक्तपणे सर्वांत मोठा विजय आहे.
डिव्हिलियर्सने केवळ ६६ चेंडूंत नाबाद १६२ धावा ठोकताच आफ्रिकेने ५ गडी गमावून ४०८ धावा उभारल्या. हाशिम अमलाने ८८ चेंडूंत ६५, फाफ डुप्लेसिसने ७० चेंडूंत ६२ आणि रिनी रोसेयूने ३९ चेंडूंत ६१ धावांचे योगदान दिले. विश्वचषकात सर्वाधिक धावा उभारण्याचा विक्रम भारताच्या नावे आहे. भारताने २००७ साली त्रिनिदाद येथे बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा उभारल्यानंतर बरोबर २५७ धावांनीच विजय साजरा केला होता.
ताहिरने ४५ धावांत अर्धा संघ गारद करताच विंडीजचा डाव ३३.१ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. काईल एबोट आणि मोर्ने मोर्केल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विंडीजकडून कर्णधार जेसन होल्डरने ५६, तसेच ड्वेन स्मिथने ३१ धावा केल्या. डिव्हिलियर्सने १७ चौकार आणि ८ षट्कार ठोकले. होल्डरला त्याने टार्गेट केले. ४८ व्या षटकांत ३४, तसेच अंतिम षटकांत ३० धावा खेचल्या. होल्डरने १० षटकांत १०४ धावा मोजल्या. विश्वचषकात सर्वांत जलद शतक ठोकण्याचा विक्रम आयर्लंडच्या केविन ओब्रायन याच्या नावे आहे. २०११ साली बंगलोर येथे त्याने इंग्लंडविरुद्ध ५० चेंडूंत शतक पूर्ण केले होते. द. आफ्रिकेचा तीन सामन्यांत हा दुसरा विजय होता. विंडीजचा चार सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा खुर्दा झाला. चौथ्या षटकापर्यंत १६ धावांत त्यांनी २ गडी गमावले. एबोटने गेलची (३) दांडी गूल केली. पुढच्या षटकात त्याने मर्लोन सॅम्युअल्सला तंबूची वाट दाखविली. ड्वेन स्मिथ याला मात्र एबोटच्याच चेंडूवर ताहिरने जीवदान दिले. मोर्केलने याला बाद केले. यानंतर ताहिरच्या फिरकीत विंडीजचे गोलंदाज अडकत गेले. स्मिथ (३१) आणि सिमन्स ००, सॅमी ५, रसेल ००, तसेच रामदीन यांना ताहिरने तंबूची वाट दाखविली. दरम्यान, होल्डरने ४४ चेंडूंत पहिले अर्धशतक नोंदविले. (वृत्तसंस्था)