West Division Inter-University Women Kabaddi Tournament start | पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला प्रारंभ 
पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला प्रारंभ 

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती : पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर गुरुवारी प्रारंभ झाला. शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतील ६१ विद्यापीठांच्या संघांतील ७०० खेळाडू या स्पर्धेत ९ डिसेंबरपर्यंत अजिंक्यपदासाठी झुंज देणार आहेत. 
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप खेडकर, मीनल ठाकरे, कुलसचिव तुषार देशमुख, विदर्भ कबड्डी फेडरेशनचे सदस्य सतीश डफळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक अविनाश असनारे, क्रीडा व शारीरिक मंडळाचे सदस्य प्रमोद चांदूरकर उपस्थित होते.
मैदानाच्या पूजनानंतर उद्घाटनपर भाषणात पोलीस आयुक्त बाविस्कर यांनी सर्व खेळाडू शिस्तीत आपल्या नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मनाचा निश्चय, सामूहिक प्रयत्न यामुळे नकारात्मकता दूर होऊन स्वत:ला जिंकण्याच्या भावनेने हा खेळ प्रत्येकाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रदीप खेडकर, मीनल ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अविनाश असनारे यांनी दिला. स्वागतपर भाषण कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले. संचालन विजय पांडे यांनी केले. उद्घाटन समारंभाला सर्व खेळाडू, संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, निरीक्षक, विविध समित्यांचे सभासद, क्रीडा संचालक, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Web Title: West Division Inter-University Women Kabaddi Tournament start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.