विंडीज १६३ धावांत गारद
By Admin | Updated: October 24, 2015 04:16 IST2015-10-24T04:16:34+5:302015-10-24T04:16:34+5:30
पहिल्या दिवशी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्ध मजबूत पकड मिळवलेल्या वेस्ट इंडिजला फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा चांगलाच फटका बसला.

विंडीज १६३ धावांत गारद
कोलोंबो : पहिल्या दिवशी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्ध मजबूत पकड मिळवलेल्या वेस्ट इंडिजला फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा चांगलाच फटका बसला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच लंकेला २०० धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६३ धावांत संपुष्टात आला. यानंतर लंकेने दुसऱ्या डावात २ बाद ७६ अशी मजल मारली असून दुसऱ्या दिवसअखेर त्यांच्याकडे ११३ धावांची आघाडी आहे.
गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व राखण्याची नामी संधी घालवली. सोबर्स यांच्या उपस्थितीत विंडिजने शानदार खेळ करताना लंकेला झटपट गुंडाळले. मात्र फलंदाजांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले. धम्मीका प्रसादने ४ तर दिलरुवान परेराने ३ बळी घेत विंडिजला हादरे दिले. विंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक ४७ धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. त्याच्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २१ धावा काढल्या. यावरुनच विंडिजची उडालेली दाणादाण लक्षात येते.
विंडिजचा १६३ धावांत खुर्दा पाडल्यानंतर लंकेने ३७ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी
७६ धावांची भर टाकून आतापर्यंत
११३ धावांची आघाडी घेतली आहे. दिमूथ करुणारत्ने शून्यावर बाद झाल्यानंतर कौशल सिल्वा
आणि कुशल मेंडिस यांनी ५५
धावांची आघाडी करुन संघाला सावरले. मेंडिस ६६ चेंडूत ७ चौकारांसह ३९ धावा काढून
परतला. दुसऱ्या दिवसअखेर सिल्वा (नाबाद ३१) आणि दिनेश चंडीमल (नाबाद ५) खेळपट्टीवर टिकून राहिले.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका पहिला डाव : ६६ षटकांत सर्वबाद २००, दिमुथ करूणारत्ने पायचीत गो. होल्डर १३, कौशल सिल्वा झे. रामदिन गो. टेलर ०, दिनेश चंदीमल त्रि.गो. टेलर २५, मिलिंदा श्रीवर्र्धना झे. टेलर गो. वारिकन ६८, रंगना हेराथ नाबाद २६, जेरॉम टेलर २/५०, केमार रोश १/३०, जॅसन होल्डर २/२२, जोमेल वारिकन ४/६७,
देवेंद्र बिशू १/१८,
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद १६३ धावा. क्रेग ब्रेथवेट ४७, जेसन होल्डर २१, केमार रोच नाबाद १७; धम्मीका प्रसाद ४/३४, दिलरुवान परेरा ३/२८, मिलिंदा सिरीवरदना २/२६.
श्रीलंका (दुसरा डाव) : ३१ षटकांत २ बाद ७६ धावा. कौशल सिल्वा खेळत आहे ३१, दिनेश चंडिमल खेळत आहे ५; जेरोम टेलर १/१५, जोमेल वॉररिकन १/२१.