विजेंदरसह पाच बॉक्सर्सची पदके निश्चित
By Admin | Updated: August 1, 2014 01:16 IST2014-08-01T01:16:13+5:302014-08-01T01:16:13+5:30
आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याच्यासह पाच भारतीय बॉक्सर्सनी २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आज, गुरुवारी उपांत्य फेरीत धडक देत पदके निश्चित केली

विजेंदरसह पाच बॉक्सर्सची पदके निश्चित
ग्लास्गो : आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याच्यासह पाच भारतीय बॉक्सर्सनी २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आज, गुरुवारी उपांत्य फेरीत धडक देत पदके निश्चित केली. त्यात दोन महिलांचादेखील समावेश आहे.
विजेंदर ७५ किलो, मनदीप जांगडा ६९, एल. देवेंद्रोसिंग ४० किलो यांनी पुरुष गटात दमदार कामगिरी बजावल्यानंतर महिलांमध्ये अनुभवी लैशराम सरितादेवी हिने ६० किलो आणि युवा खेळाडू पिंकी जांगडा हिने ५१ किलो वजनगटात उपांत्य फेरी गाठली. विजेंदरने त्रिनिदाद अॅण्ड टोबेगोचा अॅरोन प्रिन्स याला गुणांच्या आधारे ३-० ने नमविले. विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला एल. देवेंद्रोसिंग याने स्कॉटलंडचा अकिल अहमद याचे आव्हान मोडित काढले. मनदीप मात्र रिंगणात येण्याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाला. आॅस्ट्रेलियाचा डॅनिअल लुईस याला अनफिट झाल्याचा लाभ जांगडाला झाला.
३२ वर्षांची सरितादेवी हिने वेल्सची चार्लेन जोन्सचा हिचा प्रतिकार ३-१ ने मोडित काढला.
विजयानंतर सरिता म्हणाली, ‘मी देशासाठी आणि मुलासाठी पदक जिंकू इच्छिते. मी गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय संघासोबत सराव करीत असल्याने त्याला पाहिलेले नाही. त्याची फार आठवण येते. मी गर्भवती असताना ८५ किलो वजन झाले होते. नंतर पतीची पूर्ण साथ लाभल्याने रिंगणात परतू शकले. मी पदक भारतीयांना समर्पित करू इच्छिते.’
राष्ट्रीय निवड चाचणीत मेरी कोमला नमवून संघात स्थान पटकविणारी युवा पिंकी जांगडा हिने पापुआ न्यू गिनीची जॅक्लिन वांगी हिच्यावर ३-० ने सहज विजय साजरा केला. भारताने स्पर्धेत दहा सुवर्ण, १९ रौप्य आणि १२ कांस्यपदकांसह एकूण ४१ पदके जिंकली आहेत. (वृत्तसंस्था)