विदितचा ‘फ्लार्इंग स्टार्ट’
By Admin | Updated: October 7, 2014 03:13 IST2014-10-07T03:12:42+5:302014-10-07T03:13:34+5:30
‘होम फेवरेट’ ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने अपेक्षेनुसार विजयी प्रारंभ करताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज झटपट विजय नोंदवला

विदितचा ‘फ्लार्इंग स्टार्ट’
अमोल मचाले, पुणे
‘होम फेवरेट’ ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने अपेक्षेनुसार विजयी प्रारंभ करताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत आज झटपट विजय नोंदवला. अव्वल मानांकित रशियाचा ग्रँडमास्टर व्लादिमीर फेडोसीव, नेदरलँड्सचा ग्रँडमास्टर रॉबीन वॅन
कॅ म्पेन आणि महिला गटामध्ये अव्वल मानांकित रशियाची अलेक्झांड्रा गोर्याचकिना, चीनची झाओ मो यांनीही पहिल्या फेरीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांना नमवले.
अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये आज झालेल्या पहिल्या फेरीत चौथ्या मानांकित विदितने ७३वा मानांकित भारताच्याच रित्विझ परब याला अवघ्या २३ फेरीनंतर पराभव मान्य करायला भाग पाडले. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या रित्विझने राजापुढील प्यादे खेळून प्रारंभ केला. विदितने त्याला सिसिलियन डिफेन्स पद्धतीने उत्तर दिले. विदितने ११, १२ आणि १३वी चाल प्रभावीपणे खेळत सुरेख सापळा रचला.
१८व्या चालीत विदितने रित्विझचा प्यादा मारत घोड्याचा बळी देत असल्याचा आभास निर्माण केला. मात्र, असे केल्यास रित्विझला २ चालींनंतर एकतर चेकमेट स्वीकारावा लागला असता अथवा वजीर तरी गमवावा लागला असता. हे लक्षात आल्यावर रित्विझने विदितचा घोडा न मारता पराभव लांबवला. हा डाव आपण गमावणार, हे एव्हाना रित्विझच्या लक्षात आले होते. २३व्या चालीत विदितने आपला उंट रित्विझच्या हत्तीवर आणला. प्रत्युत्तरात रित्विझने हत्ती वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर पुढच्या चालीत उंटाचा बळी गेला असता. पटावर उपलब्ध असलेले बलाबल पाहता नंतर २-३ चालींत पराभव निश्चित होता. हे लक्षात आल्यावर पराभव मान्य करण्याशिवाय रित्विझकडे पर्यायच शिल्लक नव्हता. फेडोसीव याने सहजपणे एका गुणाची कमाई करताना एम. चक्रवर्ती रेड्डी याच्यावर मात केली. तिसरा मानांकित रॉबीन वॅन कॅ म्पेन याने २८ चालींनंतर स्वीत्झर्लंडच्या जेन रिंडलिसबाकर याच्यावर मात केली. मुलींच्या गटामध्ये महिला ग्रँडमास्टर अलेक्झांड्रा गोर्यचकिना हिने भारताच्या प्र्रणाली धारिया हिच्यावर विजय मिळवला. झाओ मो हिने महिला ग्रॅण्डमास्टर सॅन दिएगो मेरी अॅन्टोनेट हिच्यावर सरशी साधली.
भारताचा इंटरनॅशनल मास्टर मुरली कार्तिकेयनचा पराभव हा आजचा सर्वांत मोठा अपसेट ठरला. या २०व्या मानांकित खेळाडूला भारताच्याच सिवा महादेवन याने धक्का दिला. मुरलीला २०वे तर सिवा याला ८८वे मानांकन आहे. ग्रॅण्डमास्टर सहज ग्रोवर, ग्रँडमास्टर अंकिता राजपाडा, इंटरनॅशनल मास्टर अरविंद चिदम्बरम, इंटरनॅशनल मास्टर दिप्तीयान घोष, इंटरनॅशनल मास्टर शार्दुल गागरे या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धना नमवून पूर्ण गुणाने खाते उघडले.