Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:04 IST2025-10-28T17:03:46+5:302025-10-28T17:04:31+5:30
सोनिका ड्युटीसोबतच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. त्याशिवाय फिट राहण्यासाठी त्या जीमलाही जात असतात. त्यांच्या जीममधील व्हिडिओ पाहिले तर त्यांनी यापेक्षाही अधिक वजन उचलल्याचे दिसून येते.

Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
दिल्ली पोलीस दलातील ७ महिन्याच्या गर्भवती महिला कॉन्स्टेबलने आंध्र प्रदेश येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर २०२५-२६ मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत तब्बल १४५ किलो वजन उचलून तिने कांस्यपदक जिंकले. त्यासोबतच तिने स्क्वॉटमध्ये १२५ किलो आणि बेंच प्रेसमध्ये ८० किलोचं वजन उचलले. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या धाडसी आणि साहसी पराक्रमाचं कौतुक अनेक जण करत आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर काही कौतुक करतायेत तसे एक वर्ग या महिलेच्या पराक्रमावर नाराजी व्यक्त करत आहे. इतके भारी वजन उचलून पोटात वाढणाऱ्या बाळाचे आणि स्वत:चे नुकसान होण्याचीही शक्यता असते. ही महिला एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. दिल्ली पोलीस दलातील या कॉन्स्टेबलचं नाव सोनिका यादव असं आहे. माहितीनुसार, सोनिका नॅशनल पॉवरलिफ्टर आहेत. सोनिका यांचे इन्स्टाग्राम पाहिले तर त्यांनी त्यांचे वजन खूप प्रमाणात कमी केले आहे ज्याचे फोटोही त्यांनी पोस्ट केलेत. सोनिका ड्युटीसोबतच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. त्याशिवाय फिट राहण्यासाठी त्या जीमलाही जात असतात. त्यांच्या जीममधील व्हिडिओ पाहिले तर त्यांनी यापेक्षाही अधिक वजन उचलल्याचे दिसून येते.
सोनिका यांना मे महिन्यात त्या गर्भवती असल्याचे कळले, तेव्हाही त्यांनी जीमला जाणे आणि ट्रेनिंग करणे सोडले नाही. त्यांनी गर्भवती असतानाही वेट लिफ्टिंग सुरूच ठेवले. त्याच मेहनतीच्या बळावर त्यांना इतकं वजन उचलणे सहज शक्य झाले. सोनिका यांनी दिलेल्या मुलाखतीत लूसी मार्टिन्स यांचे नाव घेतली. लूसी यांनीही त्या गर्भवती असताना इतकेच वजन उचलले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सोनिका यांनी म्हटलं. सोनिका या कित्येक वर्षापासून वेट लिफ्टिंगवर काम करत आहेत. जर तुम्ही तुमच्या स्नायूंवरील ताण हळूहळू वाढवला तर तुमचे शरीर तेवढे वजन उचलण्याची सवय होते असं विज्ञान सांगते. सोनिका कायम हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रीत करत असतात. याआधीही त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. त्यासाठी त्या त्यांच्या डाएट आणि जीवनशैलीतील प्रत्येक सवयींवर बारकाईने लक्ष देतात.
गर्भवती असताना वेट लिफ्टिंग करणे किती सुरक्षित?
गर्भवती असताना वजन उचलणे सुरक्षित असते, परंतु त्याआधी तुम्हाला डॉक्टरांशी चर्चा करावी लागते. गर्भवती काळात भारी वजन उचलणे त्या महिलांसाठी सुरक्षित असते ज्या आधीपासून वेट ट्रेनिंग घेत असतात. सोबतच गर्भावस्थेत योग्य काळजी घेणे आणि पोटावर जास्त ताण येण्यापासून टाळणे यासारखी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. काही महिलांसाठी वजन उचलणे धोकादायक असू शकते, त्यातून स्नायू ताणले जाऊ शकतात, शिवाय प्रीमॅच्युअर डिलिव्हरीही होऊ शकते असं न्यूयॉर्कमधील ओबीजीवाईएन डॉ. लकी सेखो यांनी सांगितले.