वैशालीची अव्वल स्थानी झेप

By Admin | Updated: July 6, 2015 06:37 IST2015-07-06T06:37:01+5:302015-07-06T06:37:01+5:30

तामिळनाडूच्या फिडे मास्टर वैशाली आर. हिने ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गोव्याच्या ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीला धक्का देत अव्वल स्थानी झेप घेतली.

Vaishali toppled | वैशालीची अव्वल स्थानी झेप

वैशालीची अव्वल स्थानी झेप

मुंबई : तामिळनाडूच्या फिडे मास्टर वैशाली आर. हिने भार्इंदर येथे सुरू असलेल्या ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गोव्याच्या ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीला धक्का देत अव्वल स्थानी झेप घेतली. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूच्याच इंटरनॅशनल मास्टर मिचेल कॅथरिना पी. हिने चमकदार कामगिरी कायम राखली.
इंग्लिश पद्धतीने सुरुवात करताना वैशालीने प्याद्यांवर भर देताना भक्तीला दबावाखाली आणले. मध्यंतराला वैशालीने भक्तीच्या राजाजवळील असलेले संरक्षण भेदले व जबरदस्त हल्ला चढवला. यानंतर वैशालीने भक्तीचा वजीर जिंकताना २९व्या चालीमध्ये सामना जिंकला. यानंतर मिचेलने पुन्हा एकदा दमदार खेळ करताना इंटरनॅशनल मास्टर निशा मोहोता हिला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. अव्वल खेळाडूंकडून क्वचितच वापरल्या जाणाऱ्या अलेक्हीन बचाव पद्धतीने खेळ केला. मात्र निशाने कोणताहा अतिरिक्त धोका न पत्करता भक्कम
बचावाच्या जोरावर सामना अनिर्णित राखला.
संभाव्य विजेत्या असलेल्या ग्रँडमास्टर सौम्य स्वामिनाथनला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. आंध्र प्रदेशच्या प्रियंका नुतक्कीविरुद्ध चांगली सुरुवात केल्यानंतरही मोक्याच्यावेळी केलेल्या चुका तिला महागात पडल्याने पराभव पत्करावा लागला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Vaishali toppled