उसेन बोल्टच्या गोलंदाजीने प्रभावित : हरभजन
By Admin | Updated: September 4, 2014 01:31 IST2014-09-04T01:31:08+5:302014-09-04T01:31:08+5:30
जगातील दोन महान खेळाडूंना भेटायला मिळाल्याबद्दल हरभजन सिंग स्वत:ला भाग्यवान मानत आहे.

उसेन बोल्टच्या गोलंदाजीने प्रभावित : हरभजन
नवी दिल्ली : जगातील दोन महान खेळाडूंना भेटायला मिळाल्याबद्दल हरभजन सिंग स्वत:ला भाग्यवान मानत आहे. महान फुटबॉलपटू पेले आणि धावपटू उसेन बोल्ट यांना भेटण्याची संधी हरभजनला मिळाली होती.
काल, मंगळवारी बंगळुरू येथे झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात उसेन बोल्टने केलेल्या गोलंदाजीमुळे आपण खूपच प्रभावित झालो असल्याचे हरभजन याने सांगितले. जमैकाच्या या महान खेळाडूबरोबर खेळण्याची संधी मिळालेला हरभजन म्हणाला, ‘मला वाटतं, त्याच्या रक्तातच क्रिकेट आहे. मला त्याला जवळून पाहण्याची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याची शैली अत्यंत निदरेष होती. तो एक नैसर्गिक क्रिकेटपटू वाटत होता. तो जर क्रिकेट खेळत असता तर तो आजच्याइतकाच यशस्वी झाला असता.’
फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान हरभजनला पेले यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली होती. मात्र, बोल्टची भेट त्याच्यासाठी विशेष होती, असे त्याने सांगितले. बोल्ट ज्या पद्धतीने आपल्या प्रशंसकांना भेटत होता, हा सर्व सेलिब्रेटींसाठी एक आदर्श आहे. कार्यक्रमानंतर या महान खेळाडूने कमीत कमी शंभर जणांशी हस्तांदोलन केले. स्टार झाल्यानंतरही त्याच्या साधेपणातून खूप शिकण्यासारखे आहे.