निशांत देववर पंचांनी केला अन्याय; वादग्रस्त गुणांकनाने हिरावले पदक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 08:21 IST2024-08-05T08:21:15+5:302024-08-05T08:21:30+5:30
निशांत ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असतानाही मेक्सिकोच्या मार्को वर्दे याच्याकडून १-४ असा पराभूत झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

निशांत देववर पंचांनी केला अन्याय; वादग्रस्त गुणांकनाने हिरावले पदक?
नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये विजेत्याचा निर्णय एकमेकांना लगावलेल्या ठोश्यांवर ठरतो, पण बॉक्सिंगमधील गुणांकन प्रणाली आजपर्यंत कोणीही समजू शकलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या निशांत देवचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना.
निशांत ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असतानाही मेक्सिकोच्या मार्को वर्दे याच्याकडून १-४ असा पराभूत झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पंच कशाच्या आधारे निकाल देतात यावरून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये वाद होतो. लॉस एंजिलेस येथे २०२८ ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश अनिश्चित आहे. गुणांकनामुळे बॉक्सिंगसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम उपांत्यपूर्व लढतीत अशाच प्रकारे वादग्रस्त गुणांकनाचा फटका बसला होता.
पंचांनी गमावली विश्वासार्हता
अमॅच्युअर बॉक्सिंगची गुणांकन पद्धती बदलल्यामुळे पंचांनी विश्वासार्हता गमावली. सियोल ऑलिम्पिक १९८८, रोम ऑलिम्पिक १९६० मध्ये अनेक अधिकाऱ्यांना वादग्रस्त निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बाहेर केले. सियोल ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या रॉय जोन्स ज्युनियरला ८६ ठोशांचा वर्षाव करूनही पराभूत व्हावे लागले.