Ultimate Table Tennis League : अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच रंगणार स्पर्धा; ६ व्या हंगामात १८ ऑलिम्पिकपटूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 22:29 IST2025-05-05T22:19:05+5:302025-05-05T22:29:27+5:30
या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय टेबल-टेनिसपटूंमधील रंगतदार लढती या लीगमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Ultimate Table Tennis League : अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच रंगणार स्पर्धा; ६ व्या हंगामात १८ ऑलिम्पिकपटूंचा सहभाग
Ultimate Table Tennis : इंडियन ऑईल प्रस्तुत अल्टिमेट टेबल-टेनिस स्पर्धेच्या ६ व्या हंगाम २९ मे ते १५ जून या कालावधीत अहमदाबादच्या ईकेए एरिना येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय टेबल-टेनिसपटूंमधील रंगतदार लढती या लीगमध्ये पाहायला मिळणार आहेत. अहमदाबादमध्ये पहिल्यांदाच ही लीग आयोजित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खेळाला राष्ट्रीय एकात्मतेचे शक्तिशाली माध्यम बनविण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून भारतीय टेबल-टेनिस फेडरेशन (टीटीएफआय) च्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या खेळाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता, कारण...
पॅरिस २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष आणि महिला टेबल-टेनिस संघांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय चाहत्यांमध्ये या खेळाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळत आहे. UTT लीग तरुणांसाठी प्रेरणादायी आणि मनोरंजनाचा सर्वोत्तम अनुभव देणारी ठरेल. तसेच टेबल-टेनिसच्या पायाभूत विकासाला चालनाही मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कशी आहे अल्टिमेट लीग?
अल्टिमेट टेबल टेनिस ही भारतातील व्यावसायिक स्तरावरील टेबल टेनिस लीग आहे. २०१७ पासून खेळवण्यात येणारी लीग देशातील सर्वोत लोकप्रिय टेबल टेनिस लीग स्पर्धेपैकी एक आहे. या खेळाला प्रोत्साहन देणे. खेळाचा विकास आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही स्पर्धा भरवली जाते.
UTT (अल्टिमेट टेबल टेनिस) ची वैशिष्ट्ये...
- - १८ ऑलिम्पिकपटूंचा सहभाग (पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलेले ५ भारतीय आणि १३ विदेशी खेळाडूंसह)
- - यूटीटी सीझन-६ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठ संघ भिडणार
- - जागतिक पातळीवर वर्चस्व गाजविणाऱ्या सर्वोत्तम ४८ खेळाडूंचा समावेश
- - लीगचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस् खेल, स्टार स्पोर्टस् तामिळ आणि जियो हॉटस्टारवर (ओटीटी)