दोन अर्धशतकांमुळे आत्मविश्वास उंचावला
By Admin | Updated: September 3, 2015 22:49 IST2015-09-03T22:49:43+5:302015-09-03T22:49:43+5:30
श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल

दोन अर्धशतकांमुळे आत्मविश्वास उंचावला
नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यात मोक्याच्या क्षणी सलग दोन अर्धशतके ठोकल्यानंतर आत्मविश्वासात भर पडली. याचा लाभ द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत निश्चितपणे होईल, असा विश्वास यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने व्यक्त केला आहे.
रिद्धिमान जखमी झाल्यामुळे तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत नमन ओझाने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. रिद्धमान आता बरा झाला असून, आफ्रिकेविरुद्ध संघात स्थान मिळण्याची त्याला अपेक्षा आहे. तो म्हणाला, की आफ्रिकेविरुद्ध मालिकेस दोन महिन्यांचा अवधी आहे. त्याआधी बंगालकडून रणजी सामने खेळेन. फिजियोचा सल्ला घेताच खेळायला सुरुवात करणार आहे. गालेतील पी सारा स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत रिद्धिमानने ६० आणि ५६ धावा ठोकल्या. या धावा त्याने विपरीत परिस्थितीत ठोकल्या हे विशेष.
सिलिगुडी येथे वास्तव्य करणारा ३० वर्षांचा रिद्धिमान सात कसोटी सामने खेळला, त्यात त्याच्या २८४ धावा आहेत. आतापर्यंतच्या प्रवासात माझ्यामते रेयॉन हॅरिस हा मला सर्वांत चांगला गोलंदाज वाटल्याचे त्याने सांगितले. यष्टिरक्षणातील स्वत:च्या भूमिकेबद्दल आनंदी असलेला हा खेळाडू पुढे म्हणाला,‘‘लंकेत यष्टिरक्षण करताना मजा आली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तेथील खेळपट्ट्यांवर जो वेग पाहायला मिळाला त्यामुळे मी भारावून गेलो.’’
अखेरच्या कसोटीत नमन ओझा खेळल्याने तुझ्यावर दडपण आहे काय, असा सवाल करताच रिद्धिमान म्हणाला,‘‘मी किंवा नमन दोघांनीही सर्वोत्तम योगदान दिले.
भारताला विजय मिळाला. कोण खेळेल हे निश्चित करण्याची जबाबदारी आमच्या दोघांचीही नाही. चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.’’
(वृत्तसंस्था)