Tokyo Olympics: नीरजचे सोनेरी यश; ॲथलेटिक्समध्ये भारताचे पहिलेच सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:29 AM2021-08-08T05:29:48+5:302021-08-08T05:32:54+5:30

विशेष म्हणजे नीरज हा पात्रता फेरीतही पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी त्याने ८६.६५ मीटरची फेक केली होती.

Tokyo Olympics Neeraj Chopra creates history with Olympic Gold Medal in Javelin throw 1st ever Athletic medal for india | Tokyo Olympics: नीरजचे सोनेरी यश; ॲथलेटिक्समध्ये भारताचे पहिलेच सुवर्णपदक

Tokyo Olympics: नीरजचे सोनेरी यश; ॲथलेटिक्समध्ये भारताचे पहिलेच सुवर्णपदक

Next

टोकियो : सुरुवातीपासून पदकाची आशा बाळगली जात होती त्या भालाफेकपटू नीरज चोप्राने अपेक्षेप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकचा समारोप भारतासाठी सोनेरी यशाने केला. भारताची सुरुवात मीराबाई चानूच्या चंदेरी यशाने झाली होती. चंदेरी यशाने सुरुवात आणि सोनेरी यशाने समारोप होणारे हे भारतासाठी पहिलेच ऑलिम्पिक ठरले. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरची भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले.

नीरज चोप्रा हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरवर केलेली भालाफेक ही त्याला सुवर्णपदक जिंकून देणारी ठरली. विशेष म्हणजे नीरज हा पात्रता फेरीतही पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी त्याने ८६.६५ मीटरची फेक केली होती.

यावेळीसुध्दा त्याने ८७.०३ मीटरसह सुरुवात केली आणि दुसऱ्या फेरीत हे अंतर ८७.५८ मीटर केले .स्टार्ट टू फिनीश नीरज हाच लीडर राहिला. दुसऱ्या स्थानावरील चेक ॲथलीट याकुब व्हॅदलेच याची फेक ८६.६७ मीटर राहिली आणि तिसऱ्या स्थानीसुद्धा चेकचाच व्हितेस्लाव्ह वेसली हा ८५.४४ मीटरच्या फेकीसह आला. याप्रकारे नीरजची  ८७ मीटरची फेक शेवटपर्यंत कुणालाही पार करता आली नाही. अभिनव बिंद्रा यांच्यानंतर तो भारताचा पहिलाच आणि एकूण दुसरा वैयक्तिक सुवर्णपदक विजेता ठरला.

नीरजने केलेल्या या सोनेरी समारोपाने ऑलिम्पिक इतिहासात भारताने सात पदके जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी बजावली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुवर्णपदकाचा दावेदार मानला गेलेला आणि सातत्याने ९० मीटरच्या आसपास फेक करणारा जर्मन योहान्नेस व्हेट्टर हा अंतिम आठातही स्थान मिळवू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम ८४.६२ मीटरच्या   कामगिरीसह पाचवा आला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने ८५.३० मीटरच्या कामगिरीसह चौथे स्थान प्राप्त केले.

पहिला प्रयत्न - ८७.०३ मीटर
दुसरा प्रयत्न- ८७.५८ मीटर
तिसरा - ७६.७९ मीटर
चौथा - फाऊल
पाचवा - फाऊल
सहावा - ८४.२४ मीटर

जिंदल पिता-पुत्रांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली!
प्रिय सज्जनभाई, मनापासून  अभिनंदन ! नीरज हा जेएसडब्लू स्पोर्टसचे प्रॉडक्ट आहे. त्याला जेएसडब्लूने विशेष सहाय्य केले आणि त्याचे व्यवस्थापनही केले. त्याने आज भारताला गौरवान्वित केले आणि ट्रॅक आणि फिल्डमधील पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास निर्माण केला.मला आठवते, दोन वर्षापूर्वी आपण जेव्हा भेटलो होतो, तेव्हा ऑलिम्पिकवर चर्चा झाली होती. तेव्हा तुम्ही आणि पार्थने मला सांगितले होते, की यावेळी भारताला नक्कीच पदक जिंकून देऊ, ते सुवर्ण असेल अशी आशा आहे. आज तो शुभ दिवस आला. तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ! तुमच्या चिकाटी, समर्पण आणि दूरदृष्टीला सलाम. पुन्हा एकदा या सोनेरी दिवसासाठी हार्दिक अभिनंदन !
-विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया समूह

पूर्ण केली मिल्खा सिंग यांची इच्छा
नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण पदकासाठी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची इच्छा पूर्ण केली. नीरजची कामगिरी मिल्खा सिंग यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरली. १८ जून २०२१ रोजी मिल्खा यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. नीरजच्या आधी ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांची कामगिरी भारताकडून सर्वोत्तम ठरली होती. ०.०१ सेकंदाने ४०० मीटर शर्यतीत त्यांचे कांस्य हुकले होते. मिल्खा सिंग यांना आपल्या आयुष्यात अखेरपर्यंत या अपयशाची खंत होती. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेही होते की, ‘मी जिवंत असेपर्यंत मला भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलेले पाहायचे आहे.’ मिल्खा यांना हा दिवस पाहता आला नाही; पण आपल्या कामगिरीने त्यांची इच्छा पूर्ण करत नीरजने मिल्खा सिंग यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे.

हे अविश्वसनीय आहे. पहिल्यांदाच भारताने ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यामुळे मी खुप खुश आहे. आमच्याकडे अन्य खेळात देखील एकच ऑलिम्पिक सुवर्ण पदक आहे. हा माझ्यासाठी आणि देशासाठी गर्वाचा क्षण आहे.  क्वालिफिकेशन राऊंड मध्ये मी चांगला थ्रो केला होता. त्यामुळे मला माहित होते की मी फायनलमध्ये यापेक्षा चांगले करु शकतो. मात्र हे माहित नव्हते की सुवर्ण पदक मिळेल, मी खुप खुश आहे. 
- नीरज चोप्रा

गावसकर यांनी गायले गाणे
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार हे नीरज चोप्राच्या यशानंतर मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, हे गाणे गातांना दिसून आले. याबाबतचा एक व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात गावसकर यांच्यासोबत माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा हा देखील पदक मिळाल्यावर जल्लोष करतांना दिसून येत आहे.

नीरज चोप्राची आतापर्यंतची कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धा          २०१८ - सुवर्ण पदक
राष्ट्र कुल स्पर्धा २०१८ सुवर्ण पदक
आशियाई ॲथलेटिक्स          चॅम्पियनशीप २०१७ सुवर्ण
विश्व अंडर २० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप २०१६ सुवर्ण पदक
दक्षीण आशियाई स्पर्धा २०१६ सुवर्ण पदक
आशियाई ज्युनियर                चॅम्पियनशीप २०१६ रौप्य पदक
राष्ट्रीय विक्रम ८८.०७ मीटर (२०२१)
विश्व ज्युनियर विक्रम ८६.४८ मीटर (२०१६)

सुरुवात चंदेरी, शेवट सुवर्णमय!
भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा विशेष ठरली. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी पदक पटकावले. मीराबाई चानूने भारोत्तोलनामध्ये रौप्य जिंकून हा पराक्रम केला होता. त्यानंतर भारताने आपल्या ऑलिम्पिक मोहिमेचा शेवट बजरंग आणि नीरज यांच्या कांस्य व सुवर्ण पदकाने केली.

१२१ वर्षांनी उगवला सुवर्ण दिवस
१९०० सालापासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारताला ब्रिटिश वंशाच्या नॉर्मन पिचर्डने दोन रौप्य पदक मिळवून दिले होते. मात्र, त्यावेळी भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यामुळे नीरजच्या सुवर्ण पदकाच्या रूपाने भारताने पहिल्यांदाच अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकले. यासाठी भारताला तब्बल १२१ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. नेमबाजीत अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक पटकावले होते. तो तेव्हा वैयक्तिक पदक विजेता पहिला खेळाडू ठरला होता.

Web Title: Tokyo Olympics Neeraj Chopra creates history with Olympic Gold Medal in Javelin throw 1st ever Athletic medal for india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.