यजमान देशांमध्ये आज वर्चस्वाची लढाई
By Admin | Updated: February 28, 2015 01:21 IST2015-02-28T01:21:21+5:302015-02-28T01:21:21+5:30
चारवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा आॅस्ट्रेलिया आणि यावेळी जेतेपदाचा दावेदार मानला जाणारा न्यूझीलंड या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान

यजमान देशांमध्ये आज वर्चस्वाची लढाई
आॅकलंड : चारवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा आॅस्ट्रेलिया आणि यावेळी जेतेपदाचा दावेदार मानला जाणारा न्यूझीलंड या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भूषविणाऱ्या या दोन संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीत कोण सरशी साधणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दोन सख्ख्या शेजाऱ्यांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना मात्र रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत शानदार कामगिरी करीत असलेल्या न्यूझीलंड संघाने सलग तीन विजयाची नोंद केली आहे. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाने एक विजय मिळविला असून, एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. आॅस्ट्रेलियाने सलामी लढतीत इंग्लंडचा १११ धावांनी पराभव केला होता. मर्सिया वादळामुळे बांगलादेशविरुद्धच्या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचे स्वप्न त्यांना साकार करता आले नाही.
आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये ‘अंडरडॉग्ज’ म्हणून सहभागी होणाऱ्या न्यूझीलंड संघाला यावेळी मायदेशातील वातावरणात प्रबळ दावेदार मानले जात आहे.
आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाले, ‘ही लढत उभय संघांसाठी आव्हान आहे. मॅक्युलम आमच्यावर वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहे; पण आम्ही त्याच्याविरुद्ध काही योजना आखल्या आहेत. न्यूझीलंडने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून, लढत रंगतदार होईल. आमच्याविरुद्ध न्यूझीलंड संघ कसा खेळतो, याबाबत उत्सुकता आहे. ते आक्रमक खेळ करतील, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)