सहाऐवजी तीन दिवसांचे सरावसत्र उपयुक्त
By Admin | Updated: March 3, 2015 00:57 IST2015-03-03T00:57:49+5:302015-03-03T00:57:49+5:30
विश्वकप स्पर्धेसारख्या प्रदीर्घ कालावधीच्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा उत्साह कायम राखण्यासाठी सहा दिवसांच्या सर्वसाधारण सराव सत्रापेक्षा तीन दिवसांचे कसून मेहनतीचे सराव सत्र उपयुक्त ठरतात.

सहाऐवजी तीन दिवसांचे सरावसत्र उपयुक्त
पर्थ : भारतीय क्रिकेट संघाच्या अनियमित सराव सत्रांमुळे अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मते, विश्वकप स्पर्धेसारख्या प्रदीर्घ कालावधीच्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा उत्साह कायम राखण्यासाठी सहा दिवसांच्या सर्वसाधारण सराव सत्रापेक्षा तीन दिवसांचे कसून मेहनतीचे सराव सत्र उपयुक्त ठरतात.
दक्षिण आफ्रिका व यूएई यांच्यादरम्यानच्या लढतींमध्ये चार दिवसांचा विश्रांतीचा कालावधी असताना भारतीय संघाने केवळ दोन दिवस सराव केला. वाकामध्ये शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध
खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी पाच दिवसांची विश्रांती मिळाली असली तरी भारतीय संघ केवळ दोनच दिवस सराव करणार आहे.
यूएईविरुद्धच्या लढतीनंतर दैनंदिन सरावाबाबत धोनीने आपले मत व्यक्त करताना म्हटले,‘‘आम्ही ‘वर्कलोड शेअर’ करण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस विश्रांती व एक दिवस सराव असा प्रयत्न असतो. सहा दिवसांच्या सर्वसाधारण सरावापेक्षा तीन दिवसांचा कसून सराव चांगला असतो. कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाने आॅस्ट्रेलियातील जवळजवळ सर्वच केंद्रांवर सामने खेळले आहेत. काही आठवड्यांमध्ये खेळपट्टीमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे संघासाठी काही विशेष योजना ठरविण्याची गरज नाही.’’
धोनी पुढे म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विश्वकप स्पर्धेचा समावेश केला तर हा चार ते पाच महिन्यांचा दौरा राहील. वातावरणाबाबत विचार करता आम्हाला येथील सर्व बाबींची चांगली माहिती झाली आहे. आम्ही येथील जवळजवळ सर्वच स्थळांवर खेळलो असल्यामुळे खेळपट्ट्या कशा आहेत, याची कल्पना आहे. सात आठवडे कालावधीच्या या स्पर्धेत संघातील खेळाडू मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे ठरते. एकापाठोपाठ सामने खेळत असताना सरावापेक्षा विश्रांती महत्त्वाची आहे. सराव व विश्रांती याचा योग्य ताळमेळ साधण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. सराव करीत नाही, त्या दिवशी आम्ही जिममध्ये जातो, जलतरण करतो किंवा टेनिस खेळतो. त्यामुळे उत्साह कायम राखण्यास मदत मिळते.’’ सन २०११च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने खेळाचा दर्जा उंचावला आणि अखेरपर्यंत कायम राखला. या वेळी धोनी त्यासाठी प्रयत्नशील आहे.
या वेळीही आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक वेळी योजनेप्रमाणे सर्वकाही घडत नाही. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असायला हवे. आतापर्यंत सर्व काही आमच्यासाठी चांगले घडले. बाद फेरीमध्ये कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.
- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार