वानखेडेवर रंगणार काँटे की टक्कर
By Admin | Updated: October 25, 2015 04:13 IST2015-10-25T04:13:39+5:302015-10-25T04:13:39+5:30
विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर एकदिवसीय मालिकेत २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर

वानखेडेवर रंगणार काँटे की टक्कर
मुंबई : विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर एकदिवसीय मालिकेत २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने उतरेल. त्याचवेळी
द. आफ्रिकेलाही मालिका
विजयाची संधी असल्याने या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या मालिकेत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करून क्रिकेटप्रेमींना रोमांचक खेळाचा अनुभव करून दिला. निर्णायक चौथ्या वन-डे सामन्यात कोहलीने शानदार शतक
झळकावून भारताचे आव्हान कायम ठेवले असल्याने या संधीचे सोने करण्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांनी कंबर कसली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे महत्त्वाचे फलंदाज फॉर्ममध्ये असून, सध्यातरी कागदावर यजमानांचे पारडे वरचढ दिसत आहे.
या मालिकेत दोन्ही संघांना दुखापतींचा मोठा फटका बसला. सर्वप्रथम हुकमी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला दुखापतीमुळे पूर्ण मालिकेस मुकावे लागल्याने भारताला मोठा झटका बसला. त्याच्या जागी संघात वर्णी लागलेल्या अनुभवी हरभजनने त्याची उणीव जाणवू
दिली. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेला जेपी ड्युमिनी व मॉर्नी मॉर्कल यांच्या दुखापतीने धक्का बसला. तिसऱ्या सामन्यात हाताच्या दुखापतींमुळे ड्युमिनीला बाहेर
बसावे लागले. तर पायाच्या दुखापतीमुळे मॉर्केल मुंबईतही खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आफ्रिकेला त्याची उणीव नक्की भासेल.
(क्रीडा प्रतिनिधी)
फलंदाजी...
द. आफ्रिकेच्या तुलनेत टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अपवाद सलामीवीर शिखर धवनचा. आतापर्यंतच्या ४ सामन्यांत धवनने १६.५०च्या सरासरीने केवळ ६६ धावा काढल्या आहेत. त्याचवेळी कोहलीच्या गतसामन्यातील शतकामुळे सर्वांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला असून, अंतिम सामन्यात धवनकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
मालिकेत लक्षवेधी ठरला तो रोहित शर्मा. चार सामन्यांत एक दीडशतक व एक अर्धशतक झळाकावून त्याने मालिकेत द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्ससह संयुक्तरीत्या अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ कोहलीने धावा काढल्या आहेत. कर्णधार धोनी व भरवशाचा अजिंक्य रहाणेही चांगल्या फॉर्ममध्ये असून, सर्वांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या सुरेश रैनानेही गतसामन्यात आक्रमक अर्धशतक फटकावून आपली चुणूक दाखवली.
दुसऱ्या बाजूला आफ्रिकेचा कर्णधार डिव्हिलियर्स आणि सलामीवीर क्विंटन डीकॉक तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्याचवेळी अनुभवी हाशीम आमला आणि धडाकेबाज डेव्हिड मिल्लर यांना अजूनही अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याने आफ्रिकेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
गोलंदाजी
चेन्नईमध्ये द. आफ्रिकेच्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात फिरकीपटूंनी निर्णायक कामगिरी केल्याने अंतिम सामन्यातही भारत तीन फिरकीपटूंना खेळवण्याची शक्यता नाकारता येते नाही. वेगवान गोलंदाजांकडून अजूनही अपेक्षित कामगिरी झालेली नाही.
मोहित शर्माने त्यातल्या त्यात समाधानकारक कामगिरी केली असून, भुवनेश्वर लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संघात वर्णी लागलेल्या युवा श्रीनाथ अरविंदला मुंबईत खेळण्याची संधी मिळू शकते.
दुसऱ्या बाजूला आफ्रिकेचा वेगवान मारा मॉर्कलच्या अनुपस्थितीत काहीसा कमजोर असेल. मात्र युवा कागिसो रबाडा याने सलग ओव्हर्समध्ये भारतीयांसमोर अडचणी निर्माण करून सर्वांचे लक्ष वेधले. तसेच अनुभवी डेल स्टेनसह आफ्रिकेचा मारा समतोल आहे. इम्रान ताहीर आणि अॅरोन फांगिसो यांचा फिरकी माराही निर्णायक कामगिरी बजावू शकतो.
मॉर्कलची कमी नक्की जाणवेल : आमला
मुंबईत होणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी मॉर्नी मॉर्कल तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी असून, त्याची अनुपस्थिती संघाला निश्चितच जाणवेल, असे दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशीम आमला याने स्पष्ट केले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यासंबंधी माहिती देताना आमलाने सांगितले, की मॉर्कलने जाळीमध्ये सरावादरम्यान काही वेळ गोलंदाजी केली आहे. मात्र, सामन्याच्या काही वेळ आधी त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. असे असले, तरीही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या वन डेमध्ये मॉर्कलने मोक्याच्या वेळी ४ बळी घेऊन द. आफ्रिकेला शानदार विजय मिळवून दिला होता. या वेळी त्याच्या पायाला दुखापतही झाली आणि तो पुढील सामन्याला मुकाला. त्याच वेळी ड्युमिनीच्या दुखापतीचाही आफ्रिका संघाला फटका बसल्याचे आमलाने सांगितले.
ड्युमिनीने आफ्रिका संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची फिरकी गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी संघासाठी निर्णायक ठरते; त्यामुळे त्याचीही कमी या सामन्यात नक्की जाणवेल, असे आमला म्हणाला.
मुंबईकरांवर नजर...
या निर्णायक सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकरांकडे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने येथील परिस्थितीशी पूर्णपणे माहिती असलेल्या या दोघांचा खेळ टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरेल. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनलाही येथील खेळपट्टीचा चांगला अनुभव असल्याने त्याचा मारा निर्णायक ठरू शकतो.
वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत भारताने द. आफ्रिकेविरुद्ध तीन वन-डे सामने खेळले असून, तिन्ही सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली आहे. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा शेवटचा पराभव २००३ मध्ये आॅस्टे्रलियाविरुद्ध झाला होता.
भारत
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर
पटेल, हरभजन सिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू आणि गुरकीरत मान.
दक्षिण आफ्रिका
एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस, डीन एल्गर, डेव्हिड मिल्लर, फरहान बेहरादीन, ख्रिस मॉरीस, खाया जोंडो, अॅरोन फांगिसो, इम्रान ताहिर, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्कल, काइल एबोट आणि कागिसो रबाडा.