वन-डे मालिकेत दडपण राहील
By Admin | Updated: October 11, 2015 04:52 IST2015-10-11T04:52:12+5:302015-10-11T04:52:12+5:30
भारताविरुद्धची आगामी वन-डे सामन्यांची मालिका खडतर राहील, हे आमच्या संघातील कुणाही सदस्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. सर्वांना याची चांगली कल्पना आहे.

वन-डे मालिकेत दडपण राहील
एबी डीव्हिलियर्स लिहितो...
भारताविरुद्धची आगामी वन-डे सामन्यांची मालिका खडतर राहील, हे आमच्या संघातील कुणाही सदस्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. सर्वांना याची चांगली कल्पना आहे. टी-२० सामन्यांच्या मालिकेतील आम्ही मिळविलेल्या यशाला आता काही महत्त्व नाही. भारतात क्रिकेटचे स्वरूप मोठे होत जाते तसे ते अधिक कठीण होते. आम्ही रविवारी कानपूरमध्ये
खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे लढतीत विजय मिळविण्यास
उत्सुक आहोत. उपखंडात पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करण्यात यशस्वी ठरणारे, जगात मोजकेच
संघ आहेत. त्यामुळे वन-डे
मालिकेत आमचे लक्ष सुरुवातीपासून कामगिरीत सातत्य राखण्यावर
राहील.
दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज वेगवान गोलंदाज भारतात दाखल झालेले आहेत. डेल स्टेन, मोर्ने मोर्केल आणि फँगिसो संघासोबत जुळलेले असून दक्षिण आफ्रिका वन-डे संघाची गोलंदाजीची बाजू मजबूत
झालेली आहे. आम्ही टी-२० मालिकेत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व
गाजवण्यात यशस्वी ठरलो असून वन-डे मालिकेतही तसाच प्रयत्न
राहील. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अन्य भारतीय फलंदाज कुठल्याही गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. वन-डे मालिकेत छोटी बाबही महत्त्वाची ठरू शकते.
कानपूर वन-डे लवकरच सुरू होणार आहे. आमच्या संघातील एखाद्या खेळाडूनेही एवढ्या सकाळी एखादा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असेल, असे वाटत नाही.
अशा परिस्थितीत आम्हाला सामन्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रदेशात यशस्वी ठरण्यासाठी चांगली योजना व योग्य तयारी असणे महत्त्वाचे असते. आता १५ दिवसांच्या कालावधीत आम्हाला पाच वन-डे सामने खेळावे लागणार असल्यामुळे ही बाब अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
भविष्याबाबत विचार करणे वेगळी बाब आहे, पण मी माझ्या खेळाडूंना वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देणार आहे. एकावेळी एकाच लढतीबाबत विचार करा, असे मी त्यांना सांगितले आहे. आमचे लक्ष कानपूर वन-डे वर केंद्रित झालेले असून त्यानंतर अन्य स्थळांवर होणाऱ्या लढतींबाबत विचार करू. आगामी काही दिवस दडपण राहणार आहे.
उच्च श्रेणीचे क्रिकेट, अधिक प्रवास या दरम्यान आम्हाला खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे, पण यजमान संघ विश्व दर्जाचा आहे, हे विसरता येणार नाही. वन-डे मालिका रंगतदार होणार असून त्याचा आनंद घेण्यास तुम्ही तयार असायला हवे. (टीसीएम)