...तर भारताने सामन्यासह मालिकाही गमावली असती
By Admin | Updated: March 28, 2017 23:39 IST2017-03-28T23:30:54+5:302017-03-28T23:39:22+5:30
धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला,पण या सामन्याचाआणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता.

...तर भारताने सामन्यासह मालिकाही गमावली असती
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने 2-1 अशी मालिकाही खिशात टाकली. पण या सामन्याचा आणि पर्यायाने मालिकेचाही निकाल वेगळा लागला असता.
कसोटीच्या तिस-या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली तेव्हा भारताची धावसंख्या 248 वर 6 गडी बाद अशी होती. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 52 धावांनी पिछाडीवर होता. भारताकडून रविंद्र जाडेजा (16) आणि वृद्धिमान साहा (10) मैदानावर होते. कांगारूंकडून पहिलं षटक पॅट कमिन्सनं टाकलं. कमिन्सच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जाडेजाला पंच इयान गोल्ड यांनी बाद दिलं. त्याच्या बॅटला कडा लागूनच चेंडू यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने झेलला असल्याचा त्यांना विश्वास होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता पंचांनी त्याला बाद ठरवलं. पण चेंडू आपल्या बॅटवर लागला नसल्याचा विश्वास जाडेजाला होता त्यामुळे तात्काळ त्यानेही डीआरएसचा वापर करत रिव्ह्यू मागितला.
रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला नाही तर बॅट खेळपट्टीवर आदळल्याचं स्पष्ट झालं आणि जाडेजाला जीवदान मिळालं. बॅट खेळपट्टीवर आदळल्याचा आवाज झाल्याने चेंडू बॅटला लागल्याचं पंचांना वाटलं आणि त्यांनी जाडेजाला आऊट ठरवलं होतं.
त्यानंतर जाडेजाने 63 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारताने कांगारूंवर अत्यंत महत्वपूर्ण 32 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या 317 धावा झाल्या असताना जाडेजा बाद झाला आणि त्यानंतर अवघ्या 15 धावांमध्ये भारताचा डाव आटोपला.
जर डीआरएसची सुविधा नसती तर जाडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता आणि भारताने सामना आणि मालिकाही गमावली असती हे नक्की.