गल्लीत 'नावं' ठेवली, पण दिल्लीत नाव काढलं; शिक्षण, नोकरी अन् खेळ यासाठी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:00 IST2025-02-09T08:00:00+5:302025-02-09T08:00:30+5:30
परिसरातील लोकही खेळाला नावं ठेवत. पुढे सातवीत असताना मी राष्ट्रीय स्तरावर खेळले तेव्हा कुटुंबाला विश्वास वाटला आणि त्यांची भक्कम साथ मिळाली.

गल्लीत 'नावं' ठेवली, पण दिल्लीत नाव काढलं; शिक्षण, नोकरी अन् खेळ यासाठी संघर्ष
खो- खो म्हणजे काय तर गल्लीत खेळला जाणारा खेळ.. ना ग्लॅमर, ना व्यासपीठ यामुळे या खेळाला लोक नावं ठेवत असत. आमच्या शाळेच्या मैदानात खो-खो खेळला जायचा. एकदा शाळेच्या धावण्याच्या शर्यतीत मी पहिली आले आणि क्रीडा प्रशिक्षक करवंदे सरांनी मला खो-खोच्या सरावाला येण्याचे सांगितले; पण घरच्यांनी प्रचंड विरोध केला. प्रशिक्षक घरी आले. त्यांनी वारंवार पालकांची समजूत काढली. एक दिवस ही खो-खोमध्ये काहीतरी करीलच असा शब्द सरांनी घरच्यांना दिला. इयत्ता पाचवीपासून मी खो-खो खेळायला सुरुवात केली.
खेळाच्या सरावामुळे मी दमून जायचे. अभ्यासाला वेळ मिळत नसे. त्यामुळे आई-वडिलांचा विरोध होता. या खेळात करिअर नाही. चांगला अभ्यास करून करिअर घडव, असा त्यांचा आग्रह होता. परिसरातील लोकही खेळाला नावं ठेवत. पुढे सातवीत असताना मी राष्ट्रीय स्तरावर खेळले तेव्हा कुटुंबाला विश्वास वाटला आणि त्यांची भक्कम साथ मिळाली.
आत्मविश्वास अन् चिकाटी
प्रारंभी विरोध असतानाही मी थांबले नाही. स्वतःवर विश्वास ठेवला. संधीची वाट पाहत सलग पंधरा वर्षे खेळत राहिले.
मातीपासून मॅटपर्यंत...
मातीपासून मॅटपर्यंतच्या प्रवासात २४ राष्ट्रीय, २ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. भारतीय खो-खो महिला संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचून दिल्लीत झालेल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत जगज्जेतेपद मिळवले. मुलींनीसाठी क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, पालकांनी पाठिंबा आणि योग्य प्रशिक्षक द्यावे.
शिक्षण, नोकरी अन् खेळ
बीड जिल्ह्यातील कळमआंबा (ता. केज) हे आमचे मूळ गाव असले तरी बालपण आणि शिक्षण पुण्यात झाले. सध्या मुंबईतील आयकर विभागात मी कर सहायक आहे. क्रीडा कोट्यातून नोकरी मिळाली. शिक्षण, नोकरी आणि खेळ याचा समतोल साधण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला.
(संकलन : महेश घोराळे)