राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 09:53 IST2018-01-06T00:22:02+5:302018-01-06T09:53:47+5:30
महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी
मुंबई - महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने धक्कादायक कामगिरी करत रेल्वेची ३२ वर्षांची विजयी परंपरा खंडित करताना जेतेपद पटकावले.
हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियममध्ये झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी घेतली. पण, दुसºया सत्रात सेनादलाने महाराष्ट्राला कडवी टक्कर दिली. मोनू गोयल याने एकट्याने आक्रमण व बचावात चमक दाखवत महाराष्ट्राला दबावाखाली आणले. दखल घेण्याची बाब म्हणजे हुकमी नितीन तोमरला एकही गुण मिळवता आला नाही.
अंतिम काही मिनिटांमध्ये मैदानात आलेल्या तुषार पाटीलने तिन्हीवेळा तिसºया चढाईत प्रत्येकी एक गुण मिळवत महाराष्ट्राच्या जेतेपदामध्ये निर्णायक योगदान दिले. कर्णधार रिशांक देवाडिगा व गिरिश एर्नाक यांनीही तुफानी आक्रमण करताना सेनादलाची हवा काढली. महिलांच्या अंतिम लढतीत हिमाचल प्रदेशने बलाढ्य रेल्वेला ३८-२५ असे नमवून राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले.