मोहालीतही टीम इंडियाची ‘कसोटी’
By Admin | Updated: October 28, 2015 22:23 IST2015-10-28T22:23:09+5:302015-10-28T22:23:09+5:30
एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. मात्र, ही मालिका खूपच खडतर असेल.

मोहालीतही टीम इंडियाची ‘कसोटी’
सचिन कोरडे, गोवा
एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. मात्र, ही मालिका खूपच खडतर असेल. दक्षिण आफ्रिकन संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता भारतापुढे मोठे आव्हान असेल. त्यातच मोहालीतील खेळपट्टी भारतीय गोलंदाजांसाठी ‘कसोटी’ घेणारीच ठरेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी व्यक्त केले. शालेय खेळाडूंसाठी आयोजित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका उपक्रमासाठी चेतन शर्मा गोव्यात आले आहेत. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
येत्या ५ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेस सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना मोहाली येथे होत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावास सुरुवात केली आहे. मोहाली येथील खेळपट्टी भारतीय जलदगती गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल, असे चेतन शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतीय गोलंदाजांचा वेग आणि आफ्रिकन गोलंदाजांचा वेग याची तुलना केली तर भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान असेल. येथील खेळपट्टी ही उसळती आणि फिरकीपटूंसाठीही पोषक असते. सध्या दक्षिण आफ्रिका संघात डेल स्टेन, रबाडा, मॉर्नी मॉर्केल, इम्रान ताहिर हे गोलंदाज खूप प्रभावी ठरले आहेत. तुलनेत, भारतीय गोलंदाजांची धार बोथट दिसत आहे. भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजालाही अजून लय मिळवता आली नाही. प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कसोटी मालिकाही भारतासाठी इतकी सोपी नसेल.’’
धोनीवर शिंतोडे कशासाठी?
एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरला. या पराभवास धोनी जबाबदार आहे, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, पराभवास एकटा धोनी कारणीभूत नाही. त्यामुळे त्याच्यावर शिंतोडे उडवणे योग्य नाही. संपूर्ण मालिकेत भारताची कामगिरी खराब झाली, असे म्हणणे योग्य नाही; पण दिग्गज अपयशी ठरले हे मात्र खरे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आपण अपयशी ठरलो आहोत. धवन, रोहित, विराट हे फलंदाज फॉर्मशी झगडताना दिसताहेत. गोलंदाजी हा तर खूप चिंतेचा विषय ठरत आहे. (वृत्तसंस्था)
आफ्रिकन संघ गोव्यात
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफिकेचा संघ गोव्यात सुटी घालविण्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये निवासासाठी आला होता. आफ्रिकन खेळाडूंनी येथे विजयाचा आनंदही साजरा केला. मात्र, माध्यमांना याबाबत पुसटशी कल्पनाही लागू दिली नाही. दोन दिवसांसाठी हा संघ गोव्यात होता. आफ्रिकन संघातील खेळाडू भारतात आल्यानंतर गोव्यात नक्की येतात. आयपीएलदरम्यानही ते गोव्याला भेट देतात. सध्या पर्यटन हंगाम असून आफ्रिकन संघाने येथील किनारे आणि पर्यटनस्थळांना भेट दिली.