संघ अजूनही समतोल नाही : धोनी

By Admin | Updated: October 26, 2015 23:09 IST2015-10-26T23:09:33+5:302015-10-26T23:09:33+5:30

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे

Team India still not balanced: Dhoni | संघ अजूनही समतोल नाही : धोनी

संघ अजूनही समतोल नाही : धोनी

मुंबई : सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपली निराशा व्यक्त केली. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर मालिकाही गमावल्यानंतर धोनीने आपले मत व्यक्त केले.
सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, असे विचारले असता धोनी म्हणाला, की हा प्रश्न आज नका विचारू. साडेचारशेच्या जवळपास धावा बनल्यानंतर हा प्रश्न विचारला गेला नाही पाहिजे. सामन्यात अनेक झेल सुटले, तसेच गोलंदाजीमध्येही खूप चुका झाल्या. २०-२५ षटकांपर्यंत आम्ही सामना नियंत्रित राखला होता. मात्र यानंतर तुफान वेगाने धावा फटकावल्या गेल्या. फलंदाजीबाबत धोनी म्हणाला, की ४३८-४४० लक्ष्य निश्चित सोपे नसते. आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. आम्हीदेखील भागीदारी करायला पाहिजे होती. मात्र प्रत्येक वेळी यश मिळत नाही.
दरवेळी फलंदाजीच्या क्रमवारीत केलेल्या बदलामुळे टीकेला सामोरे जावे लागलेल्या धोनीने याबाबतीत म्हटले, की मैदान, खेळपट्टी आणि स्थिती यानुसार बदल करावे लागतात. फलंदाजीला बळकटी आणण्यासाठी मी क्रमवारीत बदल केले होते. सध्या आपल्याकडे अधिक वेळ असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दबावाचा यशस्वीपणे सामना करू शकतील, असे खेळाडू निवडण्याची गरज आहे.
सामना हरल्यानंतर खेळपट्टीवर टीका करणे हे नित्याचेच झाले आहे. ज्या खेळपट्टीवर आफ्रिकेने धावांचा हिमालय उभा केला, त्याच खेळपट्टीवर भारताचे शेर मात्र ढेर झाले. या खेळपट्टीवर टीका करताना कर्णधार धोनी म्हणाला, की ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. येथे फिरकीपटूंसाठी कोणताही टर्न मिळत नव्हता. येथे आमचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोघेही अपयशी ठरले. यामुळे चौकार व षटकारांवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि त्यामुळेच इतका मोठा स्कोअर उभा राहिला. आपल्याला जोहान्सबर्ग किंवा इतर ठिकाणी टर्निंग खेळपट्टी मिळणार नाही. आपली ताकद वेगळी असून त्यानुसारच खेळपट्टी व्हायला हवी.
प्लेसिसचे शतक सर्वोत्कृष्ट : डीव्हिलियर्स
मुंबई : तुफान फटकेबाजी करून भारतीय गोलंदाजी फोडून पाचव्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डीव्हीलियर्स याने फाफ डू प्लेसिसच्या शतकाला सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. प्लेसिसच्या शतकामुळे इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली. सामन्यात राखलेल्या एकहाती वर्चस्वानंतर आपल्या संघाचे कौतुक करताना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजी क्रमवारी आणि गोलंदाजी क्रमवारी आमच्या संघात असल्याचे त्याने सांगितले.
रविचंद्रन आश्विन आंतरराष्ट्रीय स्तराचा गोलंदाज आहे. त्याच्या दुखापतीमुळे निश्चितच भारताला मोठा फटका बसला. निर्णायक सामन्यात त्याची कमी भारताला नक्की जाणवली असेल. त्याचबरोबर मॉर्नी मॉर्केलची अनुपस्थिती आम्हाला खूप जाणवली. त्याची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे.
- एबी डीव्हीलियर्स,
द. आफ्रिका - कर्णधार

Web Title: Team India still not balanced: Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.