क्षेत्ररक्षणादरम्यान डीआरएसचा अचूक वापर करण्यात टीम इंडिया अपयशी
By Admin | Updated: February 28, 2017 04:04 IST2017-02-28T04:04:10+5:302017-02-28T04:04:10+5:30
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर त्याचे उत्तर हो असेच मिळेल

क्षेत्ररक्षणादरम्यान डीआरएसचा अचूक वापर करण्यात टीम इंडिया अपयशी
नवी दिल्ली : पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीचा (डीआरएस) अचूक वापर करण्यात भारत अपयशी ठरला? गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर त्याचे उत्तर हो असेच मिळेल. कारण, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला विशेषत: क्षेत्ररक्षणादरम्यान तिसऱ्या पंचांकडून बोल्ड व्हावे लागले.
भारताने प्रदीर्घ काळ डीआरएसचा विरोध केलेला आहे; पण गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर करण्याची तयारी दर्शविली आहे. तेव्हापासून सर्व कसोटी सामन्यात या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीबाबतचे भारतीय खेळाडूंचे अज्ञान उघड झाले आहे. डीआरएसचा स्वीकार केल्यानंतर, भारताने आतापर्यंत जे सात कसोटी सामने खेळले त्यात फलंदाजी करताना एकूण १३ वेळा मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे; पण त्यात केवळ चार वेळा निर्णय बदलण्यात यश आले. क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघाने एकूण ४२ वेळा डीआरएसचा आधार घेतला; पण त्यात केवळ १० वेळा संघाला यश मिळाले आहे.
प्रत्येक लढतीत पहिल्या ८० षटकांपर्यंत प्रत्येक संघाला डीआरएसच्या दोन संधी मिळतात. याचा वापर करताना यशस्वी ठरले तर संधी कायम राहते, पण अपयशी ठरले तर संधी वाया जाते. अनेक संघ ७० ते ८० व्या षटकांदरम्यान या प्रणालीचा वापर करीत असल्याचे दिसून येते. कारण, त्यानंतर उर्वरित संधी संपणार असते आणि नव्या संधी उपलब्ध होत असतात; पण भारतीय संघाने क्षेत्ररक्षणादरम्यान केवळ चारवेळा ७० ते ८० व्या षटकांदरम्यान डीआरएसचा वापर केला. क्षेत्ररक्षणादरम्यान डीआरएसच्या वापरात भारताला सर्वाधिक यश बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात मिळाले. त्या वेळी कोहली अँड कंपनीने तमीम इक्बाल, शाकिब अल-हसन आणि तास्किन अहमद यांच्याविरुद्ध घेतलेले रिव्ह्यू अचूक होते. यापूर्वी काहीवेळा भारतीय फलंदाजांना रिव्ह्यूचा लाभ मिळाला आहे. इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये चेतेश्वर पुजारा ८७ धावांवर खेळत असताना त्याला पायचित बाद देण्यात आले होते, पण त्याने डीआरएसचा आधार घेतल्यानंतर पंच ख्रिस गफाने यांना आपला निर्णय बदलावा लागला. पुजाराने त्या डावात शतकी (१२४) खेळी केली होती. त्याचप्रमाणे कर्णधार कोहली बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात वैयक्तिक १८० धावांवर खेळत असताना वेस्ट इंडिजचे पंच जोएल विल्सन यांनी फिरकीपटू मेहदी हसनच्या गोलंदाजीवर त्याला पायचित बाद दिले होते. कोहलीने सहकारी फलंदाज रिद्धिमान साहा याचा सल्ला घेतला आणि त्याने कर्णधाराला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. कारण त्यावेळी कोहली पुढे सरसावत खेळत होता. रिव्ह्यूमध्ये चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले. पंचांना आपला निर्णय बदलवावा लागला. त्यानंतर कोहलीने २०४ धावांची खेळी केली. कोहली सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतकी खेळी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
साहाने त्यानंतर सांगितले होते की,‘मी कोहलीला सांगितले की, तू पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न करीत होता आणि चेंडू वळला. त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला आणि पंचाने आपला निर्णय बदलला.
दुसऱ्यांदा त्याला बाद देण्यात आले त्यावेळी मी म्हटले की, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जात आहे, पण मी त्याबाबत निश्चित नाही. त्यामुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने संघासाठी रिव्ह्यूचा बचाव करण्याचा निर्णय घेतला.’ (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुण्यामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ डीआरएसमध्ये अपयशी ठरला आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान भारताने चारवेळा डीआरएसचा अवलंब केला; पण प्रत्येकवेळी भारताच्या पदरी निराशाच आली. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाने केवळ एकदा डीआरएसचा वापर केला आणि त्यातही ते यशस्वी ठरले. फलंदाजीदरम्यान आॅस्ट्रेलियाने सहावेळा डीआरएसचा वापर केला आणि त्यात ते दोनवेळा यशस्वी ठरले, तर भारतीय फलंदाज तीनपैकी केवळ एकदा (रवींद्र जडेजा) यशस्वी ठरले. दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर मुरली विजय व केएल राहुल यांनी सहाव्या षटकापर्यंत भारताचे दोन्ही रिव्ह्यू संपविले होते.