फ्रान्सने उडवला स्वित्झर्लंडचा ५-२ ने धूव्वा
By Admin | Updated: June 21, 2014 13:13 IST2014-06-21T03:41:25+5:302014-06-21T13:13:41+5:30
फिफा विश्वचषकात फ्रान्सने स्वित्झर्लंडवर ५-२ असा दणदणीत मात करत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्याच्या दिशेने आगेकूच केले.

फ्रान्सने उडवला स्वित्झर्लंडचा ५-२ ने धूव्वा
>
ऑनलाइन टीम
साल्वाडोर, दि. २१- फिफा विश्वचषकात फ्रान्सने स्वित्झर्लंडवर ५-२ असा दणदणीत मात करत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्याच्या दिशेने आगेकूच केले. आता स्वित्झर्लंडला अंतिम १६ मध्ये स्थान पटकवण्यासाठी होंडुरास विरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
फिफा विश्वचषकातील ग्रुप ईमध्ये शुक्रवारी फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड सामना पार पडला. सामन्याच्या १६ मिनीटालाच फ्रान्सच्या ओलिव्हर गेराउडने हेडरने गोल मारुन संघाचे खाते उघडले. यानंतर अवघ्या ६६ सेकंदांनी ब्लेस मॅट्यूएडीने फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. विंगर मॅथ्यू व्हॅलबुएनाने ४०व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
पहिल्या सत्रात पेनल्टीवर गोल मारण्यात अपयशी ठरलेल्या बेन्झेमाने ६७ व्या मिनीटाला संघासाठी चौथा गोल गेला. ७३ व्या मिनीटाला सिसकोने पाचवा गोल मारला. फ्रान्सने ५-० अशी आघाडी घेतल्यावर स्वित्झर्लंडच्या ब्लेरिम जेमेली आणि ग्रॅनीट खाका यांनी सामन्याच्या शेवटी दोन गोल डागले. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. स्वित्झर्लंडचा गोलकिपर डिएगो बेनागालियोने काही गोल रोखल्याने स्वित्झर्लंडचा दारुण पराभव टळला.
दरम्यान, ग्रुप ईमध्ये शुक्रवारी होंडुरास विरूध्द इक्वेडोर यांच्यात सामना झाला. यात इक्वेडोर संघाने होंडूरासचा 2-1 असा पराभव केला.होंडूरासच्यावतीने ३१ व्या मिनीटाला कार्लो कॉस्टलीने पहिला गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर इक्वेडोरच्या एनर वेलेन्सीयाने ३४ व्या मिनीटाला गोल करुन संघाला होंडुरासच्या बरोबरीने आणले. सामना संपण्याच्या २५ मिनीटांपूर्वी वॉल्टर अयोव्हीने इक्वेडोरसाठी दुसरा गोल मारुन संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. ग्रुप ईमध्ये आता फ्रान्स सहा गुणांसह पहिल्या, इक्वेडोर दुस-या तर स्वित्झर्लंड तिस-या स्थानावर आहे.