कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 05:35 IST2024-05-06T05:34:58+5:302024-05-06T05:35:15+5:30
बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले.

कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत डोपिंग चाचणी करण्यात नकार दिल्याने कुस्तीपटू बजरंग पुनियाला तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) या प्रकरणी अंधारात ठेवल्याचा आरोप भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) केला आहे. डब्ल्यूएफआय याबाबत जागतिक उत्तेजक द्रव्यसेवनविरोधी संस्थेकडे (वाडा) तक्रार करण्याची शक्यता आहे.
बजरंगला २३ एप्रिलला ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले होते. पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी त्याला ७ मेपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगण्यात आले. बिश्केकमध्ये आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी पुरुषांच्या राष्ट्रीय संघाची निवड चाचणी १० मार्चला सोनिपत येथे घेण्यात आली. सामना गमावल्यानंतर बजरंग मूत्राचा नमुना न देताच स्पर्धा ठिकाणाहून निघून गेला.
डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष संजय सिंह यांनी म्हटले आहे की, नाडाने आम्हाला बजरंगवरील कारवाईबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे’
...तर बजरंग ऑलिम्पिकमधून बाहेर
बजरंग म्हणाला की, ‘मी कधीही नाडा अधिकाऱ्यांना नमुना देण्यास नकार दिला नाही, पण अधिकाऱ्यांनी नमुना घेण्यासाठी कालबाह्य झालेले किट दिले होते. मी त्यांना विनंती केली की, याप्रकरणी केलेल्या कारवाईचे उत्तर द्यावे आणि माझी चाचणी करावी. माझे वकील या प्रकरणी उत्तर देतील.’ बजरंगने वेळेत उत्तर न दिल्यास तो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेतून बाहेर पडेल.