खेळपट्टीचे फिरणे ‘सरप्रायझिंग’ : धोनी
By Admin | Updated: September 1, 2014 14:32 IST2014-09-01T01:34:38+5:302014-09-01T14:32:27+5:30
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यांत भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळाल्यामुळे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली

खेळपट्टीचे फिरणे ‘सरप्रायझिंग’ : धोनी
नॉटिंघम : इंग्लंडविरुद्ध तिस-या वन-डे सामन्यांत भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळाल्यामुळे आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवरही फिरकीपटूंनी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असेही धोनी म्हणाला. भारताने या लढतीत विजय मिळवीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
धोनी म्हणाला, ‘संघात अद्याप सुधारणा करण्यास वाव आहे. आम्हाला गोलंदाजीवर आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. फिरकीपटूंना अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर २० ते ४० षटकांदरम्यान गोलंदाजांवर दडपण येते. येथील खेळपट्टीवर चेंडू उसळत होता आणि वळतही होता. फिरकीपटूंनी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फिरकीपटूंनी आमचे काम सोपे केले. अश्विन व जडेजा यांनी चांगला मारा केला; पण मोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर रैनानेही चांगली गोलंदाजी केली.’ रायडू व रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला व फलंदाजीमध्ये अनुक्रमे नाबाद ६४ व ४२ धावांचे योगदान दिले.
धोनी पुढे म्हणाला, ‘संघाचा समतोल साधला गेला आहे. फलंदाजीची बाजू मजबूत आहे. रोहित शर्मा आघाडीला किंवा मधल्या फळीत खेळला तरी संघासाठी फायद्याचे आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळविता आला. गोलंदाजीव्यतिरिक्त क्षेत्ररक्षणही दर्जेदार होते. रैनाने स्लिपमध्ये टिपलेला झेल शानदार होता. अशा क्षेत्ररक्षणामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. ट्रेन्टब्रिजच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी अपेक्षा नव्हती.’ रायडू वन-डे संघात चौथ्या स्थानाचा दावेदार आहे, असेही धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)