आयपीएल 9च्या फायनलचं सनरायझर्स हैदराबादनं जेतेपद पटकावलं
By Admin | Updated: May 30, 2016 00:53 IST2016-05-29T23:47:05+5:302016-05-30T00:53:53+5:30
अटीतटीच्या लढतीत अखेर सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.

आयपीएल 9च्या फायनलचं सनरायझर्स हैदराबादनं जेतेपद पटकावलं
ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. 29- अटीतटीच्या लढतीत अखेर सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 8 धावांनी आरसीबीवर विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादनं दिलेलं 209 धावांचा पाठलाग करताना विजयाला गवसणी घालण्यात आरसीबीला अपयश आलं.
आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा करता आल्यात. आरसीबीची फलंदाजांची भक्कम फळी असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीकडून गेलनं 4 चौकार आणि 8 षटकार खेचत सर्वाधिक 76 धावा कुटल्या होत्या. कॅप्टन कोहलीनंही 54 धावा केल्यात. गेल, कोहली, डी व्हिलियर्स असे आघाडी फलंदाज असतानाही आरसीबीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या अंतिम लढतीत आरसीबीसमोर विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. हैदराबादचा कॅप्टन वॉर्नरनं झंझावाती खेळीच्या जोरावर 8 चौकारांसह 3 षटकार लगावत 69 धावा काढून अर्धशतक पार केलं.
धवननं 3 चौकार आणि 1 षटकारांच्या जोरावर 28 धावा केल्या. तर युवराज सिंग 4 चौकार आणि 2 षटकार लगावत 38 धावा काढून तंबूत परतला आहे. कटिंगनं नाबाद खेळत शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहत 3 चौकार आणि 4 षटकार मारत शानदार 39 धावांची खेळी केली आहे. हेनरिक्स 4, हुडा 3, ओझा 7, शर्मा 5 धावा काढून माघारी फिरले आहेत. धवन आणि वॉर्नरनं सर्वाधिक 63 धावांची भागीदारी केली आहे.
तर आरसीबीकडून अरविंदनं वॉर्नर आणि हुडाला घरचा रस्ता दाखवला आहे. आरसीबीच्या जॉर्डननंही धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर 3 बळी मिळवले. तर चहलला एका बळीवर समाधान मानावे लागले. सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या फायनलमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. या आधी आरसीबी संघ दोनदा (2009 आणि 2011) फायनलमध्ये खेळला होता. मात्र हैदराबाद संघानं आयपीएलच्या फायनलमध्ये खेळत जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे.