राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: शिवशक्ती महिला संघाने जेतेपद पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:15 PM2020-01-02T22:15:10+5:302020-01-02T22:16:54+5:30

अक्षय जाधव, पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

State level Kabaddi tournament - Shivshakti women's team won the title | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: शिवशक्ती महिला संघाने जेतेपद पटकावले

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: शिवशक्ती महिला संघाने जेतेपद पटकावले

googlenewsNext

 ठाणे  : महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने नवतरुण क्रीडा मंडळाने आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या सहकार्याने “स्व. अनिल महादेव कर्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ” आयोजित राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांत बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन आणि महिलांत शिवशक्ती महिला संघ अंतिम विजेते ठरले. बाबुराव चांदेरे फौंडेशनचा अक्षय जाधव पुरुषांत, तर शिवशक्ती महिला संघाची पूजा यादव महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. या दोघांना रोख रु.२५,०००/-(₹ पंचवीस हजार) देऊन सन्मानित करण्यात आले. पाच ते सहा हजार क्रीडारसिकांनी अंतिम सामने पहाण्यासाठी गर्दी केली होती. महिलांचा सामना चुरशीचा झाला, पण पुरुषांच्या एकतर्फी सामन्याने त्यांचा हिरमोड झाला.

    कोळशेवाडी-कल्याण(पूर्व) येथील स्व. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या बाबुराव चांदेरे फौंडेशनने कोल्हापूरच्या छावा स्पोर्ट्सचा ३४-१२असा सहज पराभव करित रोख रु. पंच्याहत्तर हजार(₹ ७५,०००/-) आणि “श्री देवेंद्र फडणवीस चषक” आपल्या नावे केला. उपविजेत्या छावा स्पोर्टसला चषक व रोख रु. पंचावन्न हजार(₹ ५५,०००/-)वर समाधान मानावे लागले. पुणेकरांनी सुरुवातच झोकात करीत छावा संघावर पहिला लोण दिला आणि विश्रांतीला १७-०६अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. उत्तरार्धात कोल्हापूरकरांवर आणखी दोन लोण देत त्यावर कळस चढविला. मध्यांतरातील पिछाडीने दबलेल्या छावा स्पोर्टसला या धक्क्यातून सावरता आले नाही. बाबुराव चांदेरे फौंडेशनच्या अक्षय जाधव, सुनील दुबिले यांच्या भन्नाट चढायांनी छावा संघाचा बचाव खिळखिळा केला, तर मनोज बेंद्रे, विकास काळे, किरण मगर यांचा बचाव भेदने कोल्हापूरकरांना अगदीच कठीण जात होते. त्याचा परिणाम त्यांच्या एकतर्फी पराभवात झाला. छावा स्पोर्ट्सच्या ऋषिकेश गावडे, ओमकार पाटील, निलेश कांबळे, ऋतुराज कोरवी यांना या सामन्यात सुरच सापडला नाही. 

   महिलांचा अंतिम सामना तसा चुरशीचा झाला. या सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सवर ३६-२५ असा विजय मिळवीत रोख रु. पंचावन्न हजार(₹ ५५,०००/-) व “श्री देवेंद्र फडणवीस चषक” आपल्या नावे केला. उपविजेत्या राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सला रोख रु. पस्तीस हजार(₹३५,०००/-) व चषकावर समाधान मानावे लागले. शिवशक्तीने आक्रमक सुरुवात करीत राजमातावर पहिला लोण दिला आणि पहिल्या डावात १९-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात देखील आणखी एक लोण देत ती आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत हा विजय साकारला. राजमाताने दुसऱ्या डावात एका लोणची परत फेड केली. पण शिवशक्तीच्या झंजावाता पुढे त्यांची मात्रा चालली नाही. पूजा यादव, प्रणाली पाटील यांच्या आक्रमक चढाया त्याला रक्षा नारकर, पौर्णिमा जेधे, मानसी पाटील यांची मिळालेली भक्कम बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. राजमाता जिजाऊकडून सलोनी गजमल, मानसी सावंत, ऋतुजा निगडे, कोमल आवळे यांची या सामन्यात मात्रा चालली नाही.

  छावा स्पोर्ट्सचा ऋषिकेश गावडे आणि राजमाता जिजाऊची सलोनी गजमल या स्पर्धेत चढाईचे उत्कृष्ट खेळाडू ठरले. या दोघांना रोख रु. दहा हजार(₹ १०,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. बाबुराव चांदेरे फौंडेशनचा विकास काळे आणि महात्मा गांधी स्पोर्ट्सची तेजस्वी पाटेकर या स्पर्धेतील पकडीचे उत्कृष्ट खेळाडू ठरले. या दोघांना देखील रोख रु. दहा हजार(₹१०,०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील दोन्ही गटातील उदयोन्मुख खेळाडूंचा देखील रोख रु. दहा हजार (₹१०,०००/-) देऊन गौरव करण्यात आला. पुरुषांत ओम कबड्डीचा अक्षय भोपी, तर महिलांत स्वराज्य स्पोर्ट्सची समृद्धी मोहिते या स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरले. या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांधींचा ३३-३० असा, तर राजमाता जिजाऊने महेशदादा लांडगे स्पोर्ट्सचा ३८-२१ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. पुरुषांत बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने बंड्या मारुतीला ३१-२३ असे, तर छावा स्पोर्ट्सने शिवशंकर मंडळाला ३७-१६ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.

Web Title: State level Kabaddi tournament - Shivshakti women's team won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.