श्रीलंकेचा विंडीजला व्हाईटवॉश
By Admin | Updated: October 26, 2015 23:05 IST2015-10-26T23:05:14+5:302015-10-26T23:05:14+5:30
फिरकीपटू रंगाना हेराथ आणि मिलिंदा सिरिवर्धना यांच्या अचूक माऱ्यापुढे विंडीजचा संघ सोमवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला

श्रीलंकेचा विंडीजला व्हाईटवॉश
कोलंबो : फिरकीपटू रंगाना हेराथ आणि मिलिंदा सिरिवर्धना यांच्या अचूक माऱ्यापुढे विंडीजचा संघ सोमवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. श्रीलंकेने दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी विजय मिळवित मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला.
विंडीजपुढे श्रीलंकेत पहिला कसोटी विजय मिळविण्यासाठी २४४ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २० धावांची मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवशी खेळ झाला नाही. आज स्वच्छ सूर्यप्रकाशात श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि विंडीजचा डाव १७१ धावांत गुंडाळला.
फिरकीपटू हेराथने ५६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अष्टपैलू सिरीवर्धनाने त्याला योग्य साथ देताना २५ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. कमी धावसंख्येच्या या लढतीत सिरीवर्धनाने फलंदाजीमध्येही छाप उमटवली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हेराथने दोन सामन्यांत १५ बळी घेतले. हेराथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
वेस्ट इंडिजतर्फे ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ६१ धावा फटकावल्या, तर शाई होपने ३५ धावांची खेळी केली. या दोघांनी सकाळी १५ षटके संयमी फलंदाजी करीत धावसंख्या ८० पर्यंत पोहोचवली.
या दोघांच्या भागीदारीमुळे विंडीज संघाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण त्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजने ५८ धावांच्या मोबदल्यात ८ बळी गमावले. होप बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. सिरीवर्धनाच्या गोलंदाजीवर त्याला यष्टिरक्षक कुशल परेराने यष्टिचित केले. त्यानंतर विंडीज संघाच्या घसरगुंडीला प्रारंभ झाला. मरलॉन सॅम्युअल्स (६) आणि जेरमी ब्लॅकवूड (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर हेराथने दिनेश रामदिन (१०) आणि ब्राव्हो यांना एकाच षटकात माघारी परतवत श्रीलंका संघाचा विजय निश्चित केला. ब्राव्होने १३४ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व २ षटकार ठोकले.
कर्णधार जेसन होल्डर (७), जेरोम टेलर (१) आणि देवेंद्र बिशू (०) बाद झाल्यामुळे विंडीजची ९ बाद १३८ अशी अवस्था झाली. त्यानंतर जोमेल वारिकन (नाबाद २०) आणि केमार
रोच (१३) यांनी अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची केलेली भागीदारी
केवळ पराभवातील अंतर कमी करणारी ठरली.
(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव : २००. वेस्ट इंडिज पहिला डाव : सर्व बाद १६३. श्रीलंका दुसरा डाव : सर्व बाद २०६. वेस्ट इंडिज दुसरा डाव : सर्व बाद १७१.