चळवळ्या क्रीडा पत्रकार हरपला
By Admin | Updated: November 14, 2014 01:40 IST2014-11-14T01:40:28+5:302014-11-14T01:40:28+5:30
देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

चळवळ्या क्रीडा पत्रकार हरपला
मुंबई : देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. संत यांच्या निधनामुळे एक चळवळ्या पत्नकार हरपल्याची भावना क्रीडा क्षेत्रत व्यक्त होत आहे.
बुधवारपासून संत यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या छातीत असह्य वेदना होऊ लागल्या आणि राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी विक्रोळी टागोनगरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी खेळाडू, पत्रकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रीडा पत्नकारितेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे संत हे सुरुवातीला अभ्युदय बँकेत नोकरीला होते. मात्न, त्या नोकरीत त्यांचे मन फार काळ रमले नाही. 1978च्या सुमारास ते ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये रुजू झाले. तेथे तब्बल 25 वर्षे क्रीडा पत्नकार म्हणून ते कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’मध्येही त्यांनी काम केले. आकाशवाणी व दूरदर्शनवरील सर्व प्रकारच्या खेळांच्या समालोचनामुळे ते महाराष्ट्राला परिचित होते. 1983 सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे वृत्तांकन करण्यासाठी त्यांनी इंग्लंड दौराही केला होता. कपिलदेवची 175 धावांची संस्मरणीय खेळी ‘याची डोळा’ पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. भारताला दोन्ही वेळा जगज्जेते होताना पाहणा:या भाग्यवान पत्रकारांपैकी संत हे एक होते. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरावरील क्रि केटवर त्यांनी विपुल लेखन केले होते. क्रिकेटकडे ओढा असला तरी पत्नकार म्हणून देशी खेळांकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ते सतत फिरत असायचे. क्रीडा संघटनांचे पदाधिकारी असोत वा खेळाडू, संत हे प्रत्येकाच्या संपर्कात असायचे. एका अर्थाने ते मैदानावरचेच पत्नकार होते. कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी काढलेल्या जपान दौ:यातही ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ आणि कनिष्ठ पत्नकार असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. प्रत्येकाशी ते पटकन जुळवून घ्यायचे. त्यांच्या याच गुणांमुळे खेळाच्या अनेक संघटनांमध्ये विविध पदे भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली. या जबाबदा:याही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. या संघटनांच्या माध्यमांतूनही त्यांनी खेळाला, खेळाडूंना आणि क्रीडा पत्रकारांना सहकार्य केले.