स्पेन, अर्जेंटिना विजयी

By Admin | Updated: June 9, 2014 04:08 IST2014-06-09T04:08:23+5:302014-06-09T04:08:23+5:30

एटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर डेव्हिड विलाने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने ब्राझीलमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात एल साल्वाडोरचा २-० ने पराभव केला

Spain, Argentina won | स्पेन, अर्जेंटिना विजयी

स्पेन, अर्जेंटिना विजयी

वाशिंग्टन : एटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर डेव्हिड विलाने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर स्पेनने ब्राझीलमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात एल साल्वाडोरचा २-० ने पराभव केला. विलाने ६० व्या मिनिटाला हेडरद्वारे पहिला गोल नोंदविला तर ८७ व्या मिनिटाला पुन्हा एकदा चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. स्पेनिश संघातर्फे विलाने कारकीर्दीतील ५८ वा गोल नोंदविला. विश्वकप स्पर्धेत स्पेन संघ ‘ब’ गटात असून त्यांना सलामीला नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची चिली व आॅस्ट्रेलियाविरुद्ध लढत होणार आहे.
अर्जेंटिनाची स्लोव्हेनियावर मात
ला प्लाटा : कर्णधार लियोनल मेस्सी व रिकार्डो एलवाजरेज यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर विश्वकप सराव सामन्यात अर्जेंटिनाने स्लोव्हेनियाचा २-० ने पराभव केला.
अर्जेंटिनाने ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी ब्यूनास आयर्समध्ये ला प्लाटा येथे अखेरचा सराव सामना खेळला. एलवाजरेजने ११ व्या मिनिटाला तर मेस्सीने ७५ व्या मिनिटाला गोल नोंदविला.
अमेरिकेचा विजय
जॅक्सोनव्हिले : जोजी एलटिडोरने गोलचा दुष्काळ संपविताना अमेरिकेला विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात नायजेरियाविरुद्ध २-१ ने विजय मिळवून दिला. एलटिडोरने २०१४ मध्ये एकही गोल नोंदविलेला नव्हता. पण अखेरच्या सराव सामन्यात त्याने ३२ व ६८ व्या मिनिटाला गोल नोंदवीत अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशिक्षक जर्गन क्लिन्समॅनच्या संघाने ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी सराव सामन्यांत विजयाची हॅट््ट्रिक नोंदविली. यापूर्वी अमेरिकेने सराव सामन्यात अझरबैजान व तुर्की संघाचा पराभव केला. नायजेरियातर्फे व्हिक्टर मोईजेसने सामना संपायला चार मिनिटांचा अवधी शिल्लक असताना पेनल्टीवर गोल नोंदविला.
रोनाल्डोच्या आगमनामुळे
पोर्तुगालचे मनोधैर्य उंचावले
न्यू जर्सी : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा स्टार कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो पायाच्या दुखापतीतून सावरला आहे. शनिवारी रोनाल्डो संघात परतल्यामुळे पोर्तुगाल संघाचे मनोधैर्य उंचावले. स्टार फॉरवर्ड रोनाल्डोला गेल्या काही आठवड्यात दुखापतीमुळे सतावले होते. जांघ व गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या रोनाल्डोला गेल्या दोन सराव सामन्यांत सहभागी होता आले नाही. त्यामुळे ब्राझीलच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होती. पोर्तुगाल संघाची विश्वकप मोहीम १६ जूनपासून प्रारंभ होणार आहे. २९ वर्षीय रोनाल्डा अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये पोर्तुगाल संघाच्या आयोजित सराव शिबिरात सहभागी झाला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Spain, Argentina won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.